कोरोना इफेक्‍ट : मध्यरात्री मृत्यू अन्‌ पहाटेच अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

धामणगाव येथील आनंदराव सुरकर यांच्या आई उष्टाबाई सुरकर 80 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळाने मागील वर्षभरापासून त्या आजारी होत्या. अशात रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गोंडपिपरी (चंद्रपूर) : मध्यरात्री आईचा मृत्यू झाला. सरकारने कोरोनाच्या विरोधात रविवारी (ता. 22) सकाळपासून जनता कर्फ्यू लागू केला. मग काय, कुटुंबीय व गावातील सुज्ज्ञ मंडळींनी निर्णय घेतला. तातडीने अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. गावातील काही नागरिकांनी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. मध्यरात्री मृत्यू झाल्यानंतर पहाटेच अंतिम संस्कार करण्यात आले. जनता कर्फ्यू लागेपर्यंत सारेच सोपस्कार पार पाडण्यात आले. गोंडपिपरी तालुक्‍यातील धामणगावात हा प्रकार घडला. 

तालुक्‍यातील धामणगाव येथील आनंदराव सुरकर यांच्या आई उष्टाबाई सुरकर 80 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळाने मागील वर्षभरापासून त्या आजारी होत्या. अशात रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. यामुळे घरात रडारड सुरू झाली. उष्टाबाईंच्या निधनाची बातमी आजूबाजूच्यांनाही समजली. देशात अन्‌ राज्यात कोरोना व्हायरसमुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत "लॉकडाउन' करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले. कोरोनाला हरविण्यासाठी रविवारी, 22 मार्चला दिवसभर कुणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते. कोरेना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता अशा स्थितीत काय करायचे, असा प्रश्‍न कुटुंबीयांना पडला. यावेळी आनंदराव सुरकर व गावातील काही सुज्ज्ञ मंडळींनी विचार करून पहाटेच उष्टाबाई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंतिम संस्काराची तयारी सुरू झाली. गावातील काही लोकांनी सुरकर कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. पहाटे अंतिम संस्कार करण्यात आले. उष्टाबाईच्या निधनाची माहिती नातेवाईकांनाही देण्यात आली. त्यांचे गावातील नातेवाईक अंतिम संस्कारात सहभागी झाले. 

अवश्य वाचा- आदेशाचे केले उल्लंघन, बसला हा दंड...

गावकऱ्यांची मदत 

अडीच वाजता उष्टाबाई यांचा मृत्यू झाला अन्‌ पहाटेच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील काही नागरिकांनी आनंदराव यांना मदतीचा हात दिला. घराघरांतून लाकडे जमा करण्यात आली. यानंतर विधीप्रमाणे पहाटेच अंतिम संस्काराचे सोपस्कार पार पाडण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Effect: Death at midnight and funeral at Early morning