सणासुदीतला रोजगारही बुडाला अन् आली त्यांच्यावर भाजी विकण्याची वेळ...असे काय घडले..

आर. व्ही. मेश्राम
Monday, 24 August 2020

सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. परंतु, कोरोनामुळे सर्व कार्यक्रम स्थगित किंवा साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे मंडप डेकोरेशनचा व्यवसायही ठप्प झाला आहे. परिणामी, मंडप डेकोरेशन व्यावसायिकांनी भाजीपाला या अत्यावश्‍यक व्यवसायाची निवड करून हा व्यवसाय सुरू केला आहे.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया)  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनेअंतर्गत मंडप डेकोरेशन, टॅक्‍सी वाहनचालक यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. सणासुदीया दिवसांतही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मंडप डेकोरेशनची लायटिंग अन्‌ टॅक्‍सीची चाकेही जागच्या जागेवरच थांबली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सुविधा वगळता सर्व व्यवसाय बंद होते. अत्यावश्‍यक सेवेमध्ये भाजीपाल्याचा अंतर्भाव करण्यात आल्याने तालुक्‍यातील बहुतेक मंडप डेकोरेशन व वाहनचालकांनी भाजीपाला व्यवसाय सुरू केला आहे.

धार्मिक उत्सव, लग्न, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमात मंडप डेकोरेशनची मागणी असते. सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. परंतु, कोरोनामुळे सर्व कार्यक्रम स्थगित किंवा साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे मंडप डेकोरेशनचा व्यवसायही ठप्प झाला आहे. परिणामी, मंडप डेकोरेशन व्यावसायिकांनी भाजीपाला या अत्यावश्‍यक व्यवसायाची निवड करून हा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसयावरच ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत आहेत.

आर्थिक अडचणींचा सामना

त्याचप्रमाणे सडक अर्जुनीतून गोंदिया, साकोली, देवरी आदी ठिकाणी दररोज खासगी टॅक्‍सीने प्रवासी ये-जा करीत होते. परंतु, मागील पाच महिन्यांपासून खासगी वाहनांची चाके एकाच जागी थांबली आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालक व मालक यांचा व्यवसाय बुडाला आहे. काही खासगी वाहनचालकांनी भाजीपाला व्यवसाय सुरू केला असून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु, आजच्या परिस्थितीत त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.

वडिलोपार्जित व्यवसाय बुडाला
मंडप डेकोरेशन हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. याच व्यवसायाचा आधार कुटुंबाला होता. मात्र कोरोनामुळे सर्व कार्यक्रम स्थगित झाले. त्यामुळे हा व्यवसाय बंद आहे. एक महिन्यापासून भाजीपाला व्यवसाय सुरू केला आहे.
-वीरेंद्र वंजारी, मंडप डेकोरेशन व्यावसायिक, सडक अर्जुनी.

हेही वाचा : विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची कौतुकास्पद संकल्पना.. करणार हे अभिमानास्पद काम..  वाचा सविस्तर

खासगी वाहनांना परवानगी द्या
पंधरा वर्षांपासून काळीपिवळी वाहन चालवीत आहे. कोरोनामुळे वाहनाची चाके थांबली आहेत. आता भाजीपाला व्यवसाय सुरू केला आहे. शासनाने एसटी बस सुरू केली, त्याचप्रमाणे खासगी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- अखिल अकबर सय्यद, खासगी वाहन चालक, सडक अर्जुनी.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect : Decoration lighting and taxi wheels stopped