संत्र्यावर कोरोनाचा परिणाम नाही, दर दुप्पट... जाणून घ्या...

Corona has no effect on oranges
Corona has no effect on oranges

अमरावती : एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे चिंता व्यक्त होत असली तरी विदर्भातील विशेष जिल्ह्यांतील संत्रा उत्पादक मात्र कमालीचा सुखावलेला आहे. संत्रादराने अवघ्या दहा दिवसांत दुप्पट मुसंडी मारली आहे.

जिल्ह्यात संत्रा लागवडीखाली सुमारे 76 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. पाण्याची मुबलक सोय असलेल्या भागात आंबिया तर साधारण पाण्याची व्यवस्था असलेल्या भागात मृगबहार घेतला जातो. सर्वसाधारणपणे 55 ते 60 हजार हेक्‍टर संत्रालागवड क्षेत्र उत्पादनक्षम आंबिया आणि मृगबहारात निम्मे विभागलेले आहे. मृगबहाराची गोड, आंबट चवीची रसाळ संत्री जानेवारीपासून विक्रीस बाजारात येतात.

यावर्षी संत्री बाजारात येताच त्याला 20 ते 25 हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला. फेब्रुवारीमध्ये या दरात कमालीची घसरण होऊन 10 ते 12 हजार रुपये प्रतिटनपर्यंत भाव स्थिरावले. कोरोना विषाणूचे संकट समोर येताच होळीपासून संत्र्याच्या दराने पुन्हा मुसंडी घेतली. गत दहा दिवसांपासून संत्री घाऊक बाजारात 25 ते 30 हजार रुपये प्रतिटन तर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे.

देशांतर्गत सर्वच राज्यात संत्री जात असून त्याशिवाय बांग्लादेश, नेपाळ, दुबईपर्यंत विदर्भाची संत्री पोहोचली आहेत. वरुड-मोर्शी या भागातून दररोज शंभर ते दीडशे ट्रक संत्री व्यापाऱ्यांमार्फत बाहेर जात आहेत. कोरोना विषाणूच्या संकट काळातसुद्धा संत्र्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने संत्रा उत्पादकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
 

संत्र्यातील अन्नघटक (टक्‍क्‍यांमध्ये)

प्रथिने 0.9, वसा (फॅट) 0.3, खनिजे 0.4, तंतूयुक्त पदार्थ 0.6, कार्बोहायड्रेट 10.6, कॅल्शियम 0.05, फॉस्फरस 0.02, लोह 0.01, कॅरोटीन 50, व्हिटॅमिन (बी-1) 120, निकोटीनिक ऍसिड 0.3, रिबोप्लेविन (मिलीग्रॅम प्रती 100 ग्रॅम) 60, विटॅमीन सी (मिलीग्रॅम प्रती 100 ग्रॅम) 68 तर उर्जांक (प्रती 100 मिलीग्रॅम) 49.

संत्र्यात रोगप्रतिकारक शक्‍ती
संत्रा फळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा गुणधर्म असतो. संत्रा फळामध्ये क जीवनसत्त्व व व्हिटामीन बी-वनसह प्रथिने असतात. स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतरसुद्धा संत्र्याला मोठी मागणी झाली होती.
डॉ. राजेंद्र वानखडे, फलोत्पादन शास्त्रज्ञ

वाहतूक सुरळीत असावी
संत्रादरामध्ये वाढ दिलासादायक आहे. हा हंगाम 15 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र, 22 मार्चपासून 31 मार्चपर्यंत सर्वत्र बंदीचे चित्र आहे. संत्रा नाशीवंत फळ असून त्यामुळे त्याची वाहतूक सुरळीत राखणे आवश्‍यक आहे.
रमेश जिचकार, संचालक, श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com