कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णांची कोविड केअर केंद्राकडे पायी वारी...आमदारांनी केली आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

गणेश बर्वे
Sunday, 19 July 2020

शहरात एखादा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास प्रशासनाकडून त्याला सुरक्षितपणे कोविड केअर सेंटरमध्ये आणण्याची व्यवस्था केली जाते. मात्र तुमसर शहरातील दोन महिला रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी पायी चालत आल्या. त्यामुळे हे प्रकार प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाबत किती निष्काळजीपणा दाखवतात, याचे उदाहरण ठरले आहे.

तुमसर (जि. भंडारा) : शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना फोन करून तुम्ही स्वतः कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हा, असा निरोप फोनद्वारे दिला जात आहे. यानंतर दोन महिला पायी चालत या सेंटरमध्ये दाखल झाल्या. हा प्रकार प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाबत किती निष्काळजीपणा दाखवतात याचे उदाहरण ठरला आहे. असा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत आमदार राजू कारेमोरे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

देशात व संपूर्ण राज्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून अनेक कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. परंतु, प्रशासनाच्या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही.

शहरात एखादा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास प्रशासनाकडून त्याला सुरक्षितपणे कोविड केअर सेंटरमध्ये आणण्याची व्यवस्था केली जाते. यात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेऊन रुग्णाला शासकीय वाहनातून भंडारा येथील रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात पोहोचवले जाते. मात्र तुमसर येथे आतापर्यंत याचपद्धतीने रुग्णांची हाताळणी करण्यात आली आहे.

तुमसर शहरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रुग्णाचे घर आणि परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले. रुग्णाच्या संपर्कातील दोघांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रविवारी आला. त्यांना कोविड केअर सेंटरमधून भ्रमणध्वनीद्वारे याबाबत माहिती देऊन रुग्णवाहिका नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे भंडारा येथून रुग्णवाहिका येईपर्यंत तुम्ही कोविड केअर सेंटरपर्यंत या, असा निरोप देण्यात आला. त्यानंतर दोन्ही महिला रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यासाठी पायी चालत आल्या.

महिला रुग्णांची फरपट

या कोविड केअर सेंटरच्या बाहेर झाडाखाली सावलीत त्या दोन तासापर्यंत बसून होत्या. परंतु, त्यांची कोणत्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. त्यांनी वारंवार भ्रमणध्वनीद्वारे आपण येथे आल्याचे संबंधिताला सांगितले. परंतु, समोरून फक्त थांबा, थांबा असाच निरोप मिळत होता. यात अडीच तासांचा कालावधी निघून गेला. त्यानंतर आलेल्या रुग्णवाहिकेतून दोन्ही रुग्णांना भंडारा येथे नेण्यात आले. या प्रकारात संबंधित अधिकाऱ्याचा कोरोना रुग्णांबाबत निष्काळजीपणा दिसून येतो. या रुग्णांना त्यांच्या घरून सरळ भंडारा येथे हलवायला पाहिजे होते. मग, त्यांना शहरातील रहदारीच्या भागातून पायी चालत कोविड केअर सेंटरमध्ये बोलावण्याचा धोका का ओढवून घेतला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्यांना कोणती शिक्षा?

याप्रकारामुळे शहरात आणखी कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचे कृत्य संबंधित अधिकाऱ्याने केले आहे. सामान्य नागरिकांनी साधा मास्क लावला नाही; तर त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जाते. आता पॉझिटिव्ह रुग्णाला शहरातून पायी पायी चालत बोलावणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई होणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 

जाणून घ्या : पुजारी पतीच्या मंत्रतंत्राला दूर सारून डॉक्‍टरांनी महिलेची केली सुखरूप प्रसूती...जुळ्यांना दिला जन्म

आमदारांनी केली आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार

शहरातील कोरोना रुग्णांबाबत घडलेल्या घटनेवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याची दखल घेऊन आमदार राजू कारेमोरे यांनी ही बाब गंभीर असल्याचे कॉमेंट करून त्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive female patients walking to Kovid Care Center