माजी आरोग्य सभापतीच्या पत्नीने बँकेत केले काम, भावाच्या लग्नाला गेल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सोमवार (ता. 22) पासून तिने येथील बुलडाणा अर्बन बॅंकेत काम सुरू केले. दरम्यान महिलेच्या व तिच्या पतीच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्वी (जि. वर्धा) : येथील नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा प्रतिष्ठित व्यापारी यांच्या पत्नीला भावाच्या लग्नाला जाणे चांगलेच महागात पडले आहे. लग्नावरून आल्यावर प्रकृती ठीक नसल्याने तिने बुधवारी (ता. 24) रुग्णालय गाठले. यावेळी तिचा स्वॅब घेतला असता शनिवारी (ता. 27) पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लगेच जाजुवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

 

येथील बुलडाणा अर्बन बॅंकेत नोकरीवर असलेल्या या महिलेचा अमरावतीच्या दत्तकृपा कॉलनीमध्ये राहत असलेल्या भावाचे लग्न बुलडाणा येथे होते. याकरिता प्रथम ती अमरावतीला गेली. तेथून सोमवारी (ता. 15) वरातीसोबत बुलडाणा येथे गेली आणि लग्नानंतर मंगळवारी (ता. 16) ती परत आली. सोमवार (ता. 22) पासून तिने येथील बुलडाणा अर्बन बॅंकेत काम सुरू केले. दरम्यान महिलेच्या व तिच्या पतीच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सरकारी यंत्रणेला गती, जाजुवाडी परिसर सील

महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताच शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येथील प्रभारी ठाणेदार राजेश कडू व पोलिस उपनिरीक्षक गोपाल ढोले, भरारी पथकाचे साकेत राऊत, अरुण पंड्या आणि पोलिस शिपायांनी संपूर्ण जाजुवाडी परिसराचा ताबा घेतला आहे.

अवश्य वाचा- मुलांच्या डोक्यात पब्जीचा विषाणू; अनेकांची हरविली झोप

परिसरातील नागरिकांची लगबग

पोलिस यंत्रणा व भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचारी जेव्हा जाजुवाडी परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना महिला कोरानाबाधित असल्याचे कळले आणि एकच चिंता निर्माण झाली. 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्रात राहावे लागणार असल्याचे त्यांना अवगत झाले. महिला चर्चेत मग्न झाल्या; तर घरातील कर्त्या पुरुषांनी दुचाकीवर थैल्या लटकवून खरेदीकरिता बाजाराकडे धाव घेतली. परिसर सील होण्याअगोदर जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीची एकच लगबग सुरू झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive report of woman in wardha