esakal | Coronavirus: दुसऱ्या लाटेसाठी कोरोना 'टास्क समिती'; दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरातच्या रेल्वे प्रवाशांची होणार तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

The Corona Task Committee meeting has directed the system to plan health facilities assuming more than ten per cent of the Kovid patients..jpg

जिल्ह्यात सध्या एक 780 ऍक्‍टिव रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याच्या दृष्टीने 5,454 ऍक्‍टिव रुग्णसंख्येचे नियोजन करण्यात आले आहे.

Coronavirus: दुसऱ्या लाटेसाठी कोरोना 'टास्क समिती'; दिल्ली, राजस्थान, गोवा व गुजरातच्या रेल्वे प्रवाशांची होणार तपासणी

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरवात झाली आहे. देशातील अनेक राज्यांत दुसऱ्या लाटेने प्रवेश घेतला. महाराष्ट्रात देखील दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचित केले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोविड रुग्णसंख्येच्या दहा टक्‍के अधिक रुग्णसंख्या गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करण्याबाबत कोरोना टास्क समितीच्या बैठकीत यंत्रणेला निर्देश दिले आहेत. सोबतच दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात येथून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची आता तपासणी केली जाणार आहे.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना टास्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, डॉ. प्रकाश साठे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी 20 लिटर लिक्‍विड ऑक्‍सिजन टॅंक लवकरात लवकर प्रस्थापित करून सुरू करण्याविषयी अधिष्ठातांना सूचित केले. दोन्ही ठिकाणी लिक्‍विड टॅंक लागले असून शासकीय रुग्णालयील ऑक्‍सिजन टॅंक येत्या पाच सहा दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे डॉ. हुमणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात सध्या एक 780 ऍक्‍टिव रुग्णसंख्या आहे. कोरोनाची दुसरी लाट थांबविण्याच्या दृष्टीने 5,454 ऍक्‍टिव रुग्णसंख्येचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 2,182 होम आयसोलेशनमध्ये, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण 2,454, ऑक्‍सिजन खाटांची आवश्‍यकता असणारे 654, व्हेंटीलेटरवरील 82 व आयसीयुतील 82 रुग्णसंख्या असे वर्गीकरण करण्यात आले आहे. वरील अपेक्षित रुग्णसंख्येप्रमाणे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी 1977 खाटा उपलब्ध आहे. 477 खाटांची कमतरता पडेल, मात्र ही कमतरता लवकरच भरून काढण्यात येईल. ऑक्‍सिजन खाटांची मागणी 654 अपेक्षित आहे. त्या तुलनेत 823 बेड उपलब्ध आहेत.

व्हेंटिलेटर 82 अपेक्षित असताना 96 उपलब्ध आहेत. आयसीयू खाटांची संख्या 82 अपेक्षित असताना त्या 153 उपलब्ध आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 450 खाटांचे कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. त्यापैकी 50 ऑक्‍सिजन व 50 आयसीयूसह एकूण 100 खाटा स्थापित झाल्या असून उर्वरित 350 खाटांचे काम प्रगतिपथावर आहे. ते लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच सैनिक शाळा येथे कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये 400 ऑक्‍सिजन खाटांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. ऑक्‍सिजन पाइपलाइन व इतर साहित्य सामुग्रीची निविदा प्रकीया सुरू आहे. आवश्‍यकता भासल्यास या 400 खाटादेखील तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, असेही  गुल्हाने यांनी सांगितले.

तर रेल्वे प्रवासी विलगीकरण कक्षात

शासनाच्या सूचनेप्रमाणे ज्या प्रवाशांकडे प्रवासाच्या 96 तास अगोदरचे आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह रिपोर्ट नसतील त्यांची रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनासदृष्य लक्षणे आढळणाऱ्या  प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. यासाठी चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर तपासणी पथक नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तपासणी रिपोर्ट येईपर्यंत संबंधित प्रवाशाला कोविड केअरसेंटरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणाचा पर्यायदेखील खुला असेल.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image