corona-virus:‘अभी मास्क का शॉर्टेज है’, काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

 चीनसह जगभरात झपाट्याने पसरत असल्याने कोरोना आजाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रीतही आजाराचे ५ संशयीत रुग्ण आढळल्याने सर्तकता बाळगली जात असून, जनजागृती व उपाय योजना केली जात आहे. दरम्यान कोरोना आजारामुळे मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अकोल्यात मास्कचा तुटवडा पडला आहे. तर या मास्कची सध्या काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री केली जात आहे. 

अकोला :  चीनसह जगभरात झपाट्याने पसरत असल्याने कोरोना आजाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रीतही आजाराचे ५ संशयीत रुग्ण आढळल्याने सर्तकता बाळगली जात असून, जनजागृती व उपाय योजना केली जात आहे. दरम्यान कोरोना आजारामुळे मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, अकोल्यात मास्कचा तुटवडा पडला आहे. तर या मास्कची सध्या काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री केली जात आहे. 

कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्कच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून अनेक मेडिकल्समध्ये मास्कचा तुटवडा आहे. शहरातील मेडिकल्समध्ये मास्कबाबत विचारणा केल्यावर ‘अभी मास्क का शॉर्टेज है’ असे उत्तर दिले जाते. विशेष म्हणजे याच मास्कची काळ्या बाजारात मात्र चढ्या भावाने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच या मास्कची कोणी आणि कधी विक्री करावी यासंदर्भात आरोग्य विभागाने नियम आणि अटी ठरवून द्यावे अशीही मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.   

मास्कची व्हॅलीडिटी आठ तासांची
कोरोनाच नव्हे तर विविध व्हायरस श्‍वसना वाटे शरिरात पोहचू नये यासाठी जर तुम्ही मास्क वापरत असाल तर तो आठ तासांच्या वर वापरू नये कारण,  मास्क मुदत ही आठ तासांची आहे. आठ तासांनंतर योग्य त्या पद्धतीने मास्क उतरवून तो जमिनीत पुरून टाकावा, उघड्यावर कोठेही फेकू नये असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

रेल्वे विभागही करतोय जनजागृती 
मुंबई- नागपूर मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या अकोला रेल्वे स्थानकावरुन दररोज ४० हजाराहून अधिक प्रवाशी ये-जा करतात. त्यातच कोरोना आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेष दक्षता बाळगली जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. रेल्वे महाव्यवस्थापकांनी अकोला स्टेशन व्यवस्थापकांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर व बॅनर लावण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन रेल्वे स्थानकांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

असा वापरा मास्क
जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमानुसार, मास्कला समोरून हात लावू नये. जर हात लावलाच तर हात लगेच चांगले धुवावे. नाक, तोंड, दाढी पूर्णपणे झाकली जाईल अशाप्रकारे मास्क घालावा. मास्क काढताना देखील मास्कच्या इलास्टिक किंवा रिबीन पकडून मास्क काढावा. मास्कला समोरून हात लावू नये.

मास्क कुणी वापरावा?
जर तुम्हाला काहीच झालेले नसेल, तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही. पण जर तुम्ही कोरोना ग्रस्त व्यक्तीची काळजी घेत किंवा तुम्ही स्वतः कोरोना ग्रस्त असाल तर त्याचा फैलाव होऊ नये यासाठी तुम्हाला मास्कची गरज आहे. तसेच ज्यांना ताप, कफ, सर्दी किंवा खोकला झाला असेल तर त्यांनीही मास्क वापरावा. तसेच त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मास्कची किंमत पोहची 40 रुपयापर्यंत
काही महिन्यांपूर्वी केवळ डॉक्टरांच्या तोंडाला दिसणाऱ्या मास्कची मागणी वाढल्याने किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आधी निमित्त मात्र, दरात मिळणारा मास्क अकोल्यात सध्या 40 ते 50 रुपये देऊनही मिळत नसल्याचे वास्तव आहे.  यासोबतच हॅण्डग्लोजचीही अशीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona-virus:No masks found in Akola City Medical