झाडीपट्टीतील मंडई उत्सवावर कोरोनाचे सावट; कलावंतांना सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा

संतोष रोकडे
Monday, 2 November 2020

शेतकरी, शेतमजूर थकवा घालविण्यासाठी लोककलेचा आधार घेतात. गत अनेक वर्षांपासून झाडीपट्टीत मंडई उत्सवाची परंपरा सुरू आहे. परंतु, यावर्षी या आनंदाच्या पर्वावर विरजण पडण्याची दाट शक्‍यता आहे. मंडई व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना यावर्षी सरकार परवानगी देणार की नाही, या बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : येत्या १४ तारखेला दिवाळी सण साजरा होत असून, दिवाळीच्या पाडव्यानंतर झाडीपट्टी म्हणून गाजलेल्या गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या चार जिल्ह्यांत मंडई उत्सव मोठ्या थाटामाटात व आनंदात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंडई उत्सवावर सावट पसरले आहे.

दिवाळी सणांच्या दिवसात शेतकऱ्यांच्या घरी खरीप हंगामातील उत्पादन विकून हाती पैसा असतो. त्यामुळे मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते. शेतात काबाडकष्ट करून धान्य पिकविणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना शेतीच्या कामातून थोडी उसंत याच कालावधीत मिळत असते.

जाणून घ्या : सातबारावरील 'सरकार' मिळू देईना पीककर्ज; धानही विकता येत नाही; बळीराजा संकटात

संभ्रमाचे वातावरण

शेतकरी, शेतमजूर थकवा घालविण्यासाठी लोककलेचा आधार घेतात. गत अनेक वर्षांपासून झाडीपट्टीत मंडई उत्सवाची परंपरा सुरू आहे.
परंतु, यावर्षी या आनंदाच्या पर्वावर विरजण पडण्याची दाट शक्‍यता आहे. मंडई व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार की नाही, सरकार या कार्यक्रमांना परवानगी देणा कि, याबाबत ग्रामीण जनता व लोककला सादर करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

अनेक रोजगाराच्या संधीपासून हुकणार

दिवाळी पर्वापासून ग्रामीण भागामध्ये मंडई, नाटक, दंडार, खडीगंमत, नाट्यप्रयोग, तमाशा, डान्स, हंगामा व इतर समाजप्रबोधन व मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळते. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोककलावंतांसह लहान व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. या माध्यमातून विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह जुळविले जातात. कौटुंबिक, सामाजिक एकोपा जोपासला जातो.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा मंडई उत्सवावर विरजण पडेल, यात शंका नाही.

अवश्य वाचा : भंडारा जिल्ह्यात ७९ केंद्रात धान खरेदी सुरू; धान निघाल्याने शेतकऱ्यांना विक्रीची लगबग

शासनाकडून कोणताही निर्णय नाही

मंडई उत्सव कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत अजून शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. झाडीपट्टीतील लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रमांवर असलेली बंदी उठविण्याची मागणी शासनाकडे केली असली; तरी लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यात चर्चा सुरू आहे. अजून शासनाने मंडई उत्सव आयोजनाच्या बाबतीत ठोस निर्णय न घेतल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's savat at the Mandai festival in the Zadipatti