esakal | काय ही माणुसकी : कोरोनाच्या संशयावरून त्याला गावात प्रवेश नाकारला

बोलून बातमी शोधा

file photo

खासगी ट्रकवर काम करणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाच्या संशयावरून गावात प्रवेश नाकारल्याची घटना दर्यापूर तालुक्‍यातील शिरजदा गावात घडली. एकाही व्यक्तीने त्याला आश्रय न दिल्याने निराश्रित म्हणून त्याला सध्या दर्यापुरात यावे लागल्याची घटना उजेडात आली.

काय ही माणुसकी : कोरोनाच्या संशयावरून त्याला गावात प्रवेश नाकारला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : गेल्या काही दिवसांपासून त्याला सर्दी-खोकल्याचा त्रास आहे. अमरावती येथील इर्विन रुग्णालयात त्याची कोरोनाबाबत तपासणीसुद्धा करण्यात आली. मात्र त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्‍टरांनी त्याला 14 दिवस काळजी घ्यावी म्हणून घरी आराम करावा, अशा सूचना दिल्या.

त्यामुळे ती व्यक्ती आपल्या मूळगावी शिरजदा येथे आली. मात्र गावातील नागरिकांनी त्याचा प्रवेश नाकारला. तालुक्‍यातील शिरजदा या गावातील ही व्यक्ती असून अमरावती येथे एका ट्रक कंपनीत क्‍लिनर म्हणून काम करते.

कुटुंबात कुणीही नाही

गत्याची गरीब परिस्थिती असून घर पडक्‍या अवस्थेत आहे. त्याच्या कुटुंबात कुणीही नाही. आजवर गावात आल्यावर मित्राकडे राहणे होत असे. मात्र आता कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ ग्रासले असल्याने कोणत्याही मित्राने त्यांना आश्रय दिला नाही. त्यांच्या हातावर कोरोना टेस्टबाबतचा होम क्वारंटाइनचा शिक्कासुद्धा आहे.

कुणीही जागाच देत नाही

गावात कोठेही राहण्यास जागा देत नसल्याने 14 दिवस आराम कसा करावा, असा प्रश्न त्याला पडला आहे. गावातील पोलिस पाटील व सचिव यांनी त्याला दर्यापुरातील रुग्णालयात जाण्याची सूचना केली. त्यामुळे तो दर्यापुरात आला. मात्र संचारबंदी असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. अखेर चौकशीकरिता त्याला पोलिस स्टेशनला आणले. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका अधिकारी व डॉक्‍टरांना देण्यात आली. सर्व अधिकाऱ्यांनी गावातील पोलिस पाटील, सरपंच यांना समजावले. गावातील शाळा किंवा तत्सम जागा काही दिवसांकरिता त्याला देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा : कोरोनानिमित्ताने भेटताहेत माणसातले देव

शाळेत मिळाला आश्रय
या व्यक्तीस शिरजदा येथील शाळेत आश्रय देण्यात येणार आहे. याबाबत ग्रामस्थांसोबत बोलणे झाले आहे. ही व्यक्ती त्याच गावातील असल्याने व त्याला घर नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
- योगेश देशमुख, तहसीलदार.

त्याची व्यवस्था करू
ही व्यक्ती कोरोनाबाधित नाही. केवळ साधारण तपासणी झाली आहे आणि अहवाल निगेटिव्ह आला आहे. आम्ही चौकशी केली आहे. या व्यक्तीला घर नाही. अधिकारी स्तरावर निर्णय घेऊन त्याची व्यवस्था करू.
- तपन कोल्हे, ठाणेदार.