आता त... कापसाचाही बजेट हुकला!

अनुप ताले
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

यंदा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मूग, उडिदाचे संपूर्ण पीक उद्‍ध्वस्त झाले. परंतु कापसावर शेतकऱ्यांची भीस्त कायम होती. मात्र कापसाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने, कापसाचाही बजेट हूकल्याचे चित्र दिसत आहे.

अकोला  : यंदा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मूग, उडिदाचे संपूर्ण पीक उद्‍ध्वस्त झाले. कापसाच्या पिकाला मात्र यंदा चांगले भाव मिळून सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, महिनाभरापासून जिल्ह्यात कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने, कापसाचाही बजेट हुकल्याचे चित्र असून, भाववाढीची शक्यताही धुसर झाल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस व कीडीच्या प्रादूर्भावामुळे शेतीच्या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. 2017-18 मध्ये कापसावर गुलाबी बोंडअळीने हल्ला चढविल्याने अख्खा कापूस हंगाम नुकसानात गेला. 2018-19 मध्ये गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी यश आले परंतु, दुष्काळ स्थितीने कापूस उत्पादनात मोठी घट आली. 2019-20 मध्ये मात्र कापसाची मागणी अधिक राहण्यासोबतच उत्पादन वाढीचीही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार यंदा मॉन्सून उशिरा येऊनही शंभर टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर कापूस पेरणी झाली. मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा काही प्रमाणात फटका कापूस पिकाला बसलाच. त्यानंतरही बहुतांश भागात एकरी दहा ते 18 क्विंटल कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना होत आहे. तरी सुद्धा कापूस उत्पादकांच्या पदरी निराशाच येत असून, हमीभावापेक्षाही कमी भावाने शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यंदा मध्यम धाग्याचा कापसाला शासनाने प्रतिक्विंटल 5255 व लांब धाग्याच्या कापसाला 5550 रुपये हमीभाव दिला आहे. परंतु, खासगी कापूस खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल 4500 ते 5000 रुपये, सीसीआय केंद्राद्वारे 5300 ते 5450 रुपये व कॉटन फेडरेशन द्वारे 5450 ते 5500 रुपये भावाने कापूस खरेदी सुरू आहे.

मार्चमध्ये सर्व कापूस खरेदी करावा
कापूस उत्पादकांची यंदा बिकट स्थिती आहे. कापूस उत्पादन यंदा 30 ते 40 टक्क्यांनी घटले, बाजारात भावही 4500 ते 5000 हजार रुपये मिळत आहे. निसर्गाच्या प्रकोपाने (पावसामुळे) पिकाची गुणवत्ता घसरली आहे. ‘सीसीआय’च्या निकषात असा कापूस बसत नसल्याने चिंतेची बाब ठरत असून, शासनाने निकष शिथिल करुन व मार्चमध्ये सर्व कापूस खरेदी करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- गणेश नानोटे, कापूस उत्पादक शेतकरी, निंभारा

जिल्ह्याभरात सहा लाख क्विंटलची खरेदी
जिल्ह्यात तेल्हारा, बोरगाव मंजू व कानशिवनी येथे कॉटन फेडरेशन, अकोट, हिवरखेड, निंबी, चिखलगाव, कापशी, पारस, पातूर, बार्शीटाकळी येथे सीसीआय व अकोट, तेल्हारा, हिवरखेड, कापशी, बोरगाव मंजू, पारस, बार्शीटाकळी या सर्व कापूस खरेदी केंद्रांवर आतापर्यंत केवळ सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून, त्यामध्ये सर्वाधिक ‘सीसीआय’द्वारे खरेदी करण्यात आली आहे. `

भाववाढीची शक्यता धूसर
तीन हजारावर गेलेले ढेपीचे भाव सध्या 1800 ते 1900 रुपयांपर्यंत घसरले असून, ‘सरकी’ला सुद्धा प्रतिक्विंटल 1900 ते 2000 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता धूसर झाली असून, ‘कोरोना’ संसंर्गामुळे चिनमध्ये कापसाची निर्यात थांबल्याचाही परिणाम कापसाच्या भावावर होणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton crop also breaks expectations