कापसाच्या भावातील पडझड कायम

कृष्णा लोखंडे - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

अमरावती - खरेदीच्या मुहूर्तानंतर कापसाच्या भावातील घसरण कायम आहे. शनिवारी पुन्हा कापसाचे भाव घसरून पाच हजारांपेक्षाही कमी झालेत; तर सोयाबीनची आवक वाढली. त्याचा कमाल भाव 2 हजार 920 वर पोहोचला. हरभऱ्यात पुन्हा तेजी आलेली असली, तरी आवक अल्प आहे.

अमरावती - खरेदीच्या मुहूर्तानंतर कापसाच्या भावातील घसरण कायम आहे. शनिवारी पुन्हा कापसाचे भाव घसरून पाच हजारांपेक्षाही कमी झालेत; तर सोयाबीनची आवक वाढली. त्याचा कमाल भाव 2 हजार 920 वर पोहोचला. हरभऱ्यात पुन्हा तेजी आलेली असली, तरी आवक अल्प आहे.

नगदी पीक असलेल्या कापसावर मंदीचे सावट आहे. अमरावती बाजार समितीत सोमवारी (ता. 21) गाजावाजात खरेदीचा मुहूर्त साधल्यानंतर खासगी बाजारातील भाव वधारतील, ही अपेक्षा या आठवड्यात सातत्याने पडलेल्या भावाने फोल ठरवली. मुहूर्ताच्या पहिल्या वाहनातील कापसाला साडेपाच हजारांचा भाव जाहीर झाला खरा; मात्र पदरी 5 हजार 150 रुपयेच पडलेत. त्यानंतर कापसाचे भाव चढले नाहीत. या सप्ताहातील अखेरच्या दिवशी शनिवारी (ता. 26) तो पाच हजारांपेक्षाही कमी झाला. खासगी बाजारात कापसाला शनिवारी 4 हजार 950 हा कमाल आणि 4 हजार 900 रुपये किमान भाव मिळाला.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून 4 हजार 700 ते 4 हजार 800 रुपये भावात खरेदी सुरू आहे. परतवाडा येथील जिनिंगवर 5 हजार 50 रुपये भाव मिळाला. अमरावतीच्या खासगी बाजारात शनिवारी 516 क्विंटल कापसाची आवक झाली. नोटाबंदीपूर्वी कापसाला पाच हजारांहून अधिक भाव होता. एकाच आठवड्यात दोनशे रुपयांनी घसरण झाली.

सोयाबीनच्या बाजारात आवक जोमाने वाढलेली असली, तरी भाव मात्र तीन हजारांचा आकडा पार करू शकला नाही. शनिवारी अमरावती बाजार समितीत 16 हजार 294 पोत्यांची आवक नोंदली गेली. नोटाबंदीनंतरची ही पहिली विक्रमी आवक ठरली. सोयाबीनला शनिवारी बाजार समितीत 2 हजार 400 ते 2 हजार 920 रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या किमतीत अद्याप हवी ती सुधारणा होत नसून गेल्या काही दिवसांपासून किंचित वाढ झाली.

हरभरा मात्र वधारत चालला असला, तरी आवक मात्र अत्यल्प आहे. गत हंगामातील शिल्लक व साठवलेला हरभरा बाजारात येत असून दोन दिवसांपूर्वी पडलेल्या भावात सुधारणा होऊन शनिवारी तो पुन्हा चढला. 10 हजार रुपये कमाल; तर 9 हजार 500 रुपये किमान भाव राहिला. गत आठवड्यात 10 हजारांवर असलेला भाव बुधवारी (ता.23) दोन हजारांनी पडले होते, ते शनिवारी सावरलेत. बुधवारी हरभऱ्यास 8 हजार ते 8 हजार 300 रुपये भाव होता. हरभऱ्याचे चढते भाव बघून यंदा जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी दुपटीने वाढली. सोयाबीन पडल्यावर शेतकरी हरभऱ्याकडे वळल्याने पेरणीक्षेत्रात वाढ झाली. या हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग घसरल्याने शेतकरी हरभऱ्याकडे वळला; मात्र हरभऱ्यातील घसरण बघून तो चिंतेत आहे.

Web Title: Cotton prices downfall