कापसाचं नाणं खणखणणार!

अनुप ताले
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कपाशीचं बोंड खुलते की नाही, भाव मिळते की नाही, याची शेतकऱ्यांना  धास्ती... मात्र बोंडंही खुलले आणि बाजारात भावही फुलले अन् चार दिवसात पाचशे रुपयांनी मिळाली दरवाढ.

अकोला : मूग गेला, उडीद गेला, सोयाबीनचे उरले फक्त कुटार... कापसालाही अतिवृष्टीचा बसला फटका आणि गुलाबी बोंडअळीनेही दिला झटका... त्यामुळे कपाशीचं बोंड खुलते की नाही, भाव मिळते की नाही, याची शेतकऱ्यांमध्ये भरली धास्ती... मात्र बोंडंही खुलले आणि बाजारात भावही फुलले अन् चार दिवसात पाचशे रुपयांनी मिळाली दरवाढ... त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांनाही बळ मिळाले असून, यंदा कापसाचं नाणं खणखणणार, असे संकेतही बाजार विश्लेषकांनी दिले आहेत.

सन 2017-18 मध्ये देशी तसेच बीटी कपाशीवरही गुलाबी बोंडअळीने हल्ला चढवून जवळपास 80 टक्के कापूस उत्पादन फस्त केले होते. 2018-19 मध्ये दुष्काळ स्थितीमुळे खरिपातील तसेच रब्बीतील सर्वच पिकांना फटका बसल्याने, सुमारे 50 ते 60 टक्के कापूस उत्पादन घटले होते. 2019-20 मध्ये मात्र सरासरीपेक्षा अधीक पाऊस पडला आणि गुलाबी बोंडअळीसह इतर कीडींच्या प्रादूर्भावावरही नियंत्रण मिळविण्यात आतापर्यंत शेतकऱ्यांना यश आले. परंतु, यंदा आॅगस्टच्या सुरुवातीपासून ते आॅक्टोरच्या अखेरपर्यंत सतत पावसाने हजेरी लावल्याने व मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात अतिवृष्टी झाल्याने, खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी पिके उद्‍ध्वस्त झाली तसेच कपाशीलाही फटका बसला. मात्र त्यामुळे उत्पादनावर खूप जास्त फरक पडण्याची शक्यता कमी आहे. तरी सुद्धा लाल्या, काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव, अतिवृष्टीचा फटका, असा एकत्रित परिणाम लक्षात घेता कापसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमीच राहणार आहे. शिवाय तीन वर्षापासून उत्पादनात सातत्याने घट आणि मागणी वाढत असल्याने, यंदा मागणीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच सहा ते साडेसहा हजार दर कापसाला मिळण्याची अपेक्षा बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

सेंद्रिय कापसाला मागणी अधिक
पाश्चात्य देशातून सेंद्रिय कापसाची सर्वाधिक मागणी राहते तसेच सेंद्रिय कापसाचा सर्जिकल कॉटन आणि दवाखान्यातील वापर अधीक असल्याने, सेंद्रिय कापसाची मागणी यंदाही जास्त राहणार आहे. त्यामुळे सेंद्रिय कापसाला भावही बीटी तसेच रासायनिक उपयोगातून निर्मित कापसाच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोन ते चार हजार भाव अधीक राहू शकतो.

दरवाढीची ही चार प्रमुख कारणे
चार दिवसात सरकीच्या भावात दोनशे रुपायांनी वाढ झाली. आवकेमधील 60 टक्के कापूस सीसीआय घेत आहे. आता येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला आहे. या चार प्रमुख कारणांनी सध्या कापसात चारशे ते पाचशे रुपये भाववाढ झाली असून, सहा हजारावर भाव मिळू शकेल.
- वसंत बाछुका, कापूस व्यापारी, अकोला

उत्पादन घटल्याचा परिणाम
दरवर्षीप्रमाणे यंदाही जवळपास 25 ते 30 टक्के उत्पादन घटणार आहे. कापसाची गुणवत्ताही घसरली असून, मागणी अधिक उत्पादन कमी, अशी स्थिती बाजारात आहे. त्यामुळे यावर्षी निश्चितच कापसाला सहा हजाहून अधीक भाव मिळेल. सोमवारी सर्वाधिक साडेपाचशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
- गणेश नानोटे, प्रगतशील कापूस उत्पादक शेतकरी, निभारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton prices will rise