शेतकऱ्यांना आता बुधवारची वाट; कापूस खरेदी होणार सुरू 

अनुप ताले
Sunday, 19 April 2020

जवळपास 40 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने आणि कापूस खरेदी बंद झाल्याने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. परंतु, आता जिल्ह्यात कापूस खरेदीचे जिल्हा उपनिबंधकांनी निर्देश दिले असून, बुधवारपासून (ता.22) प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे.

अकोला : जवळपास 40 टक्के कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने आणि कापूस खरेदी बंद झाल्याने, शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. परंतु, आता जिल्ह्यात कापूस खरेदीचे जिल्हा उपनिबंधकांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मूर्तिजापूर वगळता सर्व बाजार समित्यांतर्गत बुधवारपासून (ता.22) कापूस खरेदी केली जाणार असून, या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

यंदा कापूस हंगाम लांबल्याने, उशिरापर्यंत कापूस निघाला. कापूस खरेदी केंद्रांवर खरेदी प्रक्रिया सुद्धा संथ गतीने राबविण्यात आली आणि नंतर लॉकडाउन घोषित केल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद आहेत. त्यामुळे हंगामातील निम्‍म्याहून अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समिती अंतर्गत परवानधारक खासगी व्यापाऱ्यांना मूर्तिजापूर व्यतिरीक्त सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कापूस खरेदी सुरू करण्यास जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी परवानगी दिली आहे.

 

कापूस खरेदीसाठी अटी व शर्ती

 • 1) ‘सीसीआय’कडे नोंदणी झालेल्या फक्त अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी व्हावी.
 • 2) 18 ते 21 एप्रिल रोजी शेतकऱ्यांनी कापूस विक्री संदर्भात बाजारसमितीनिहाय केवळ संपर्क क्रमांकावर नोंदणी करुन टोकन क्रमांक घ्यावा.
 • 3) शेतकऱ्यांची नोंदणी करतांना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व विक्रीस आणावयाचा कापूस किती? याची नोंद घ्यावी.
 • 4) शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, बॅंक पासबुक, आधारकार्ड सोबत आणावे.
 • 6) कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत बाजार समिती व खरेदीधारकांने प्रसिद्धी द्यावी.
 • 7) एफ.ए.क्यू. दर्जाचाच माल शेतकऱ्यांनी सीसीआय व कॉटन फेडरेशनकडे विक्रीसाठी न्यावा.
 • 8) नॉन एफएक्यू मालाची खासगी व्यापाऱ्यांनी प्रत पाहून भाव ठरवावे व शेतकऱ्यास मान्य असल्यास व्यवहार करावा.
 • 9) सर्व कर्मचारी/ कामगारांना सहायक निबंधक व बाजार समिती सचिवाचे संयुक्त स्वाक्षरीने पासेस द्याव्यात व रजिस्टरमध्ये त्याची नोंद करावी.
 • 10) 22 एप्रिलपासून सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत दररोज प्रत्यक्ष कापूस खरेदी होईल.
 • 11) 18 ते 21 दरम्यान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाल्याशिवाय पुढील कापूस खरेदी करू नये.
 • 12) बाजार समितीने 18 ते 21 दरम्यान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांना प्रसिद्धी द्यावी.
 • 13) प्रत्येक खरेदी केंद्रावर उपलब्ध संसाधने व कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने दररोज कापूस खरेदीसाठी बोलावयाच्या शेतकऱ्यांची संख्या ठरवावी.
 • 14) आधी नोंदणी झालेल्यांचा कापूस प्रथम प्राधान्याने खरेदी करावा.
 • 15) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लघुसंदेश व दूरध्वनीद्वारे वार, दिनांक, वेळ कळवावा.

 

नोंदणी करण्यासाठीचे नावे व क्रमांक

कृषी उत्पन्न बाजार समिती संपर्क व्यक्ती संपर्क क्रमांक
अकोला सुरेश कराळे 9822208156
बार्शीटाकळी शंकर बाडे
संदीप सरप
9309794882
9011027694
पातूर किरण तायडे 9552981715
हिवरखेड (तेल्हारा) सु.सो. नात्रे
ब. श्री. पाथ्रीकर
9881941042
9764621614
बाळापूर विनोद भाजीपाले 7620997946

 

अकोट केंद्रावर या नंतर नोंदणी
कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या केंद्रावर, अगोदर नोंदणी झालेल्या सुमारे 2700 शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी झाल्यावर पुढील नोंदणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton purchases in Akola district from Wednesday