कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी राहण्याची भीती

विनोद इंगोले
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

नागपूर : जागतिक मंदी आणि स्थानिकस्तरावर गेल्या हंगामातील शिल्लक साठा, सरकीच्या दरातील घसरण, वाढती आयात अशा अनेक कारणांमुळे यंदाच्या हंगामात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी राहण्याची भीती कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. व्यापाऱ्यांकडून कापसाला अपेक्षित दर मिळणार नसल्याने कापूस पणन महासंघ तसेच सी.सी.आय.(कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडेच कापसाचा ओघ वाढेल, असेही सांगितले जाते.
कापूस क्षेत्राच्या अभ्यासकांच्या मतानुसार, 2018-19 या हंगामात 25,951 हजार मेट्रिक टन कापसाचे उत्पादन जागतिकस्तरावर झाले. त्यात भारताचा वाटा 5,770 हजार मेट्रिक टन तर अमेरिकेचा 4000 हजार मेट्रिक टन आहे. 2019-20 या वर्षाच्या हंगामात 27,348 हजार मेट्रिक टन जागतिक स्तरावर, भारतात 6314 तर अमेरिकेत 4800 हजार मेट्रिक टन इतके उत्पादन अपेक्षित आहे. त्या तुलनेत जागतिक स्तरावर गेल्या हंगामात 26,260, भारतात 5,334 हजार मेट्रीक टन इतकी मागणी होती. यावर्षी 26,796 जागतिक स्तरावर तर भारताची मागणी 5,443 हजार मेट्रिक टन राहणार आहे. गेल्या वर्षीचा जागतिक स्तरावरील शिल्लक साठा 17,477 तर भारताचा 1,943 हजार मेट्रिक टन आहे. यावर्षी जागतिक स्तरावर 17,952 तर भारतात 2,248 हजार मेट्रिक टन साठा शिल्लक असणार आहे. गेल्यावर्षी दरातील तेजीच्या परिणामी भारतात कापसाखालील लागवड क्षेत्र वाढीस लागले. त्यामुळे उत्पादकताही वाढणार असल्याने त्याचा दरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी सरकीचे दर 3400 रुपये क्‍विंटलवर पोचले होते. यावर्षी हे दर 2300 ते 2400 रुपये राहतील, असा अंदाज आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton rate will be lower than msp