esakal | अन त्यांचा अखेरचा प्रवासही सोबतच झाला...आणि गहिवरली गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

dhamangao

धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे हे आपल्या पत्नी सौ रजनी तितरे यांना रुग्णालयात नेण्यासाठी यवतमाळला निघाले होते दरम्यान यवतमाळ घाटात विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका टिप्परने दिलेल्या धडकेत राजेंद्र तितरे यांचा जागीच तर रजनी चित्रे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

अन त्यांचा अखेरचा प्रवासही सोबतच झाला...आणि गहिवरली गर्दी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगाव रेल्वे : जवळपास 35 वर्षांपूर्वी विवाहाच्या वेळी सोबत जगण्याच्या आणाभाका घेतल्या आणि गेली पस्तीस वर्ष त्या जपल्या सुद्धा. अनेक संकटात समर्थपणे एकमेकांच्या हातात हात देऊन धीराने शून्यातून आपला संसार उभा केला. प्रत्येक सुख मी आधी तुझ्या पुढे करेन आणि दुःख मात्र सर्वप्रथम स्वतःकडे घेईन. अशी लग्न संस्काराच्या वेळी घेतलेली शपथ राजेंद्र तितरे यांनी तंतोतंत पाळत स्वतः मृत्यू पत्करला मात्र अर्धांगिनी म्हणून प्रत्येक दुःखात मी सुद्धा तुमच्या सदैव सोबत असेल अशी शपथ घेणाऱ्या त्यांच्या पत्नी रजनी राजेंद्र तितरे यांनी सुद्धा विवाह संस्काराच्या वेळी घेतलेली शपथ पूर्ण करत अवघ्या एका तासाच्या अंतराने रुग्णालयात जीव सोडला. प्रत्येक सुखदुःखात आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या या जिवलग पती-पत्नीच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास सुद्धा सोबतच व्हावा या उद्देशातून आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राजेंद्र तितरे आणि रजनी तितरे या दोघांच्या अंतयात्रा सुद्धा सोबतच शेवटच्या प्रवासाला निघाल्या हा सोबतचा शेवटचा प्रवास पाहून उपस्थितांचे डोळे सुद्धा पाणावले होते.
धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे हे आपल्या पत्नी सौ रजनी तितरे यांना रुग्णालयात नेण्यासाठी यवतमाळला निघाले होते दरम्यान यवतमाळ घाटात विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका टिप्परने दिलेल्या धडकेत राजेंद्र तितरे यांचा जागीच तर रजनी चित्रे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार (ता.20) त्यांच्या निवासस्थानाहून सोबतच निघाली. यावेळी कावली या गावासह वाठोडा, वसाड, गव्हा फरकाडे, अंजनसिंगी, मंगरूळ, धामणगाव, विरूळ यासह पंचक्रोशीतील जनसमुदाय गोळा झाला होता

अनेकांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

प्रचंड मेहनतीने उभ्या केलेल्या स्वतःच्याच संत्र्याच्या वाडीत राजेंद्र तितरे व रजनी तितरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी श्रद्धांजली सभेत आमदार अरुण अडसड, आमदार प्रताप अडसड ,माजी आमदार विरेंद्र जगताप विद्यमान आमदार प्रताप अडसड सावता माळी महासंघाचे अध्यक्ष वाळके गुरुजी,पुरुषोत्तम वाळके वर्धा, नीलेश मोहकार,पंचायत समिती माजी सभापती गणेश राजनकर आदींनी श्रध्दांजली अर्पण केली

एकाच चितेवर आईवडिलांना मुलाने दिला भडाग्नी

अखंड आयुष्य एकत्रित जगलेल्या राजेंद्र आणि रजनी तितरे यांची अंत्ययात्रा सोबतच निघाल्यानंतर दोघांनाही एकाच चितेवर अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर मुलगा अविनाश याने आईवडिलांच्या चितेला भडाग्नी दिला.