esakal | बासरी वाजविणाऱ्या कुटुंबाला हक्काच्या घराचा सूर गवसेना...घरकुलापासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

सडक अर्जुनी : मडावी यांचे जीर्ण घर.

सडक अर्जुनी तालुक्‍यातील थाडेझरी येथील एका बासरी वादकाचे कुटुंब उघड्यावरचे जीवन जगत आहे. कित्येक दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय पडक्‍या घरातच राहत आहे. पावसाळ्यामध्ये ते दुसऱ्याच्या घराचा आसरा घेतात. या कुटुंबाची व्यथा कोणी समजून घेईल काय?

बासरी वाजविणाऱ्या कुटुंबाला हक्काच्या घराचा सूर गवसेना...घरकुलापासून वंचित

sakal_logo
By
आर. व्ही. मेश्राम

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील थाडेझरी येथील एका बासरी वादकाचे कुटुंब उघड्यावरचे जीवन जगत असून, अद्यापही त्यांना घरकुल मिळाले नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या घराचा आसरा त्यांच्या कुटुंबाला घ्यावा लागत आहे.

थाडेझरी येथील भास्कर कारू मडावी हे जन्मापासून दृष्टिहीन होते. परंतु, त्यांना बासरी वाजवण्याची कला अवगत झाली होती. पूर्वी लग्न समारंभाप्रसंगी बासरी वाजविण्यासाठी ते जात असत.

2004 मध्ये गावातील वनिता या मुलीशी त्यांचे लग्न झाले. त्यांना शैलेश नावाचा मुलगा; तर करिश्‍मा नावाची मुलगी आहे. शासनाकडून दिव्यांगांना मिळणाऱ्या मानधनावर त्यांच्या कुटुंबाचा गाडा सुरू होता. अशातच जानेवारी 2020 मध्ये भास्करचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व भार त्यांच्या पत्नी वनितावर आला. त्यानंतर मुलीकरिता स्थळाची शोधाशोध केली.

दोन्ही कुटुंबे निराधार

खोडशिवनी येथील मुनेश्‍वर रामजी उईके या मुलाशी लग्नगाठ जुळली. विशेष म्हणजे, मुलगा लहान असतानाच त्याचे आई-वडील मृत्यू पावले. म्हणजेच मुलगी वडिलाचे छत्र हरपलेली; तर मुलगा आई-वडिलांचे छत्र हरपलेला होता. मुलगा व मुलगी दोघेही निराधार. दोन्हीही कुटुंबाची परिस्थिती नाजूक. त्यातही कोरोनामुळे लॉकडाउन. ही परिस्थिती लक्षात घेता खोडशिवनी येथील आपात्कालीन व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने मुलाच्या घरी याच महिन्यात 7 जूनला करिश्‍माचा मुनेश्‍वरसोबत साध्या पद्धतीने विवाह पार पडला.

पडक्‍या घरातच वास्तव्य

उल्लेखनीय म्हणजे, कित्येक दिवसांपासून बासरी वादकाचे कुटुंब पडक्‍या घरात राहत आहे. पावसाळ्यामध्ये ते दुसऱ्याच्या घरी राहण्यासाठी जातात. पडक्‍या घरात जीवन जगत असूनही त्यांना घरकुल मंजूर करण्यात आले नाही. तसेच नागझिरा अभयारण्यात पुनर्वसन केलेल्या थाडेझरी येथे राहत असूनही वन्यजीव विभागाने कोणतीच मदत केली नाही. शासनानेसुद्धा त्यांची उपेक्षा केली आहे. या कुटुंबाला प्रशासनाने घरकुल मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.

जाणून घ्या : पार्टीत पोहोचला कोरोना रुग्ण अन् नागपूरच्या या परिसरातील ७०० जणांचा झाला घात

नवदांपत्यास शासनाने मदत करावी
लॉकडाउनमुळे लग्न समारंभास बाधा निर्माण झाली होती. अशातच आपात्कालीन व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने थाडेझरी येथील वधू करिश्‍मा मडावी व खोडशिवनी येथील वर मुनेश्‍वर उईके या दोघांचाही विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला. या नवदांपत्यास शासनाने मदत करावी.
- भृंगराज परशुरामकर, पोलिस पाटील, खोडशिवनी.