गुराख्याच्या अंगावरून गेला गाईंचा कळप; तरीही तो सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

- तरीही तो सुखरूप 
- जांभोरा गावातील दीडशे वर्षे जुनी परंपरा 
- 300 गायी गुराखी विनायक परतेकी यांच्या अंगावरून धावल्या 
- ग्रामस्थ राजकीय मतभेद, आपसी वैर बाजूला ठेवत गोधन पूजेला उपस्थित राहतात 

मोहाडी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील जांभोरा येथे अंगावरून गोधन धावविण्याची परतेकी कुटुंबाने सुरू केलेली 150 वर्षांची परंपरा यावर्षीही तेवढ्याच उत्साहाने जोपासली गेली आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी 300 गायी गुराखी विनायक सुरेश परतेकी यांच्या अंगावरून धावल्यानंतरही त्यांना थोडीही इजा झाली नाही. यानंतर गावातून मिरवणूक काढून विधिवत गोमातेचे पूजन करण्यात आले. 

रविवारी देशभरात लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे करण्यात आले. सोमवारी दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच बलिप्रतिपदाच्या दिवशी विदर्भात विविध पद्धतीने गोधनाची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचे फार महत्त्व आहे. शेतकरी गोठ्याला, घराला झेंडूच्या माळा लावून सजवतो. 

गुराख्याकडून गावातील सर्व गाईंना आंघोळ घातली जाते. गाईंना सजवून, नवीन दावे, गेटे, म्होरकी बांधून गेरू व रंगाने अंग, शिंगे रंगविले जातात. गाईंना मोहफूल, पीठ, तांदळाची खिर खाऊ घातली जाते. यानंतर गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर सूर्य, चंद्र आदी चित्र रेखाटले जाते. नेहमीच्या गुराख्याला, स्त्रियांना गोठ्यातील कामांपासून सुटी दिली जाते. यांनी गाईंची गावातून वाजतगाजत थाटात मिरवणूक काढली जाते. 

परंतु, जमिनीवर पालथे पडून अंगावरून गोधन धावविण्याची वैशिष्टेपूर्ण परंपरा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील जांभोरा गावातील परतेकी कुटुंबाने आजही जोपासली आहे. मिरवणूक चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि गोधन त्याच्या अंगावरून जातो. तरी देखील गुराख्याला इजा होत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातून नागरिक जांभोरा गावात येतात. ग्रामस्थ राजकीय मतभेद, आपसी वैर बाजूला ठेवत गोधन पूजेला उपस्थित राहतात. यावर्षीही परंपरा जोपासली गेली. 
नारायण परतेकी यांनी सुरू केली परंपरा 
तब्बल दीडशे वर्षांपूर्वी गुराखी नारायण परतेकी यांनी ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून ही परंपरा गावात चर्चेचा विषय झाली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा सुरेश परतेकी यांनी वडिलांची परंपरा सुरू ठेवली. सुरेश परतेकी यांचे वय झाल्यामुळे आता त्यांचा मुलगा विनायक परतेकी ही परंपरा सुरू चालवित आहे. दिवसेंदिवस अंगावरून गोधन धावविण्याची परंपरा लोकप्रिय होत असून, हे बघण्यासाठी गावातील व आजूबाजूच्या गावातील नागरिक गर्दी करीत असतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cows run from the yard