esakal | तरुणांमध्ये वाढतेय बॉडी पियर्सिंगची क्रेझ, मागास गडचिरोली जिल्ह्यातही टूम...
sakal

बोलून बातमी शोधा

piercing.

बॉडी पियर्सिंगची अनेक दुकाने आहेत. त्यात आरोग्यविषयक स्वच्छता, उत्तम दर्जाची साधने वापरलीच जातात, असे नाही. त्यामुळे गंभीर आजाराचे संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार सजण्यासाठी बरा असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणाराच ठरत आहे.

तरुणांमध्ये वाढतेय बॉडी पियर्सिंगची क्रेझ, मागास गडचिरोली जिल्ह्यातही टूम...

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : भारतीय परंपरेत कान, नाक टोचण्याला विशेष महत्त्व आहे. तसा हा प्रकार मुलींसाठीच असतो. पूर्वी मुलांचेही कान टोचले जायचे. कानात पुरुष जो दागिना घालत त्याला भिकबाळी म्हणायचे. पण आता हा शरीर छेदनाचा प्रकार बॉडी पियर्सिंग नावाने पाश्‍चात्त्य फॅशनच्या अतिरेकी रूपात रूढ होऊ पाहत आहे. विशेष म्हणजे महानगरात धुमाकूळ घालणारी ही बॉडी पियर्सिंगची टूम आता गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम, मागास जिल्ह्यातही वाढताना दिसत आहे.
अनेक तरुण मुले, मुली शरीराला छेदून त्यात सोने, प्लॅटिनम, टायटॅनियम किंवा इतर धातूचे छोटे दागिने घालणे पसंत करत आहेत. काहीजण हे पियर्सिंगचे वेड जपण्यासाठी शारीरिक यातनाही सहन करत आहेत. तसा पुरातन काळापासून वेगवेगळ्या स्वरूपात शरीर छेदनाचा वापर केला जातो. आजपर्यंत सापडलेल्या सर्वांत जुन्या ममीच्या अवशेषांमध्ये कानातले दागिने आढळून आले आहेत, याचा अर्थ चक्‍क पाच हजार वर्षांपूर्वी कान टोचण्याचे प्रकार होत होते. पण, आता हा प्रकार अतिरेकी फॅशनच्या नव्या रूपात दाखल झाला आहे. नाक, कानासोबतच भुवई, ओठांच्या खाली किंवा वर, छातीवर, बेंबीवर अगदी गुप्तांगांवरही पियर्सिंग करण्याचे फॅड वाढत आहे. आजची तरुणाई आपले शरीर सजविण्यासाठी म्हणून याकडे बघत असली, तरी त्यातून अनेक धोकेही निर्माण होतात. यातील सर्वांत मोठा धोका संसर्गाचा असतो. शरीरात छेद दिल्यावर नीट काळजी न घेतल्यास जंतू किंवा रोगांचा संसर्ग होऊ शकतो. शरीर छेदनानंतर विविध धातूंचे दागिने वापरले जातात. त्याचीही अनेकांना ऍलर्जी असते. त्यातून समस्या निर्माण होऊ शकतात. छेदलेल्या ठिकाणी फोड किंवा सूज येऊ शकते. प्रसंगी रुग्णालयातही दाखल करावे लागते. अनेकदा जिभेसारख्या नाजूक भागात छेदन करताना नस क्षतिग्रस्त होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, अप्रशिक्षित व्यक्तीकडून असे छेदन झाल्यास अतिरक्तस्राव होऊ शकतो किंवा चुकीच्या ठिकाणी छेदन होऊ शकते. अलीकडे अशा प्रकारची बॉडी पियर्सिंगची अनेक दुकाने आहेत. त्यात आरोग्यविषयक स्वच्छता, उत्तम दर्जाची साधने वापरलीच जातात, असे नाही. त्यामुळे गंभीर आजाराचे संक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार सजण्यासाठी बरा असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणाराच ठरत आहे.

सविस्तर वाचा - या कारणामुळे डॅडीला पॅरोल मंजुर...45 दिवस राहणार बाहेर

महिनाभर राहिला उपाशी...
बॉडी पियर्सिंगचे वेड असलेल्या गडचिरोलीतील सुशांत दुग्गा या तरुणाने अनेक ठिकाणी छेदन केले आहे. कानात ठिकठिकाणी छेद केल्यानंतर त्याला जिभेला छेदन करण्याची इच्छा झाली. पण, जिभेचे छेदन झाल्याने चक्‍क महिनाभर त्याला नियमित आहार घेताच आला नाही. संपूर्ण महिनाभर तो द्रवपदार्थांवरच होता. आपल्याला याची आवड असल्याने हे कष्ट झेलताना विशेष वाटले नाही, असेही तो म्हणाला.

पियर्सिंगने गॅंगरीनचा धोका
बॉडी पियर्सिंग शरीर सजावटीसाठी किंवा फॅशनसाठी केली जाते. पण, त्यातून आनंद मिळत असला, तरी या छेदनाच्या प्रक्रियेत रक्तवाहिनीला नुकसान होऊ शकते. गॅंगरीनचा धोकाही असतो. त्यामुळे तरुणाईने अशी फॅशन करताना आरोग्याचे होणारे नुकसान समजून घेत योग्य ती काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचा अतिरेक शेवटी वाईटच असतो.
- डॉ. यशवंत दुर्गे, शल्यचिकित्सक, गडचिरोली