'डायट'ने प्रारंभ केली बोलीभाषा शब्दकोश निर्मिती

- प्रकाश दुर्गे
रविवार, 29 जानेवारी 2017

अहेरी (जि. गडचिरोली)  - गडचिरोली जिल्ह्यात प्रमाण मराठी माहीत नसलेले अनेक लोक आहेत. विशेषत: आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण राज्यात सीमेत असलेले नागरिक व आदिवासी मुलांना मराठी भाषा कळत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गणित व भाषा या विषयात 100 टक्‍के मुले प्रगत करण्यासाठी जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था (डायट)ने बोलीभाषा शब्दकोश निर्मितीचा उपक्रम प्रारंभ केला आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाकरिता पूर्ण राज्यात शाळा दत्तक घेऊन विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जात आहेत. यात शिक्षण विभागाला बऱ्याच अंशी यशसुद्धा मिळाले आहे. परंतु, भाषा विषयाचा विचार करता आजही विद्यार्थी मागे आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता येथील कोणत्याही गावात शंभर टक्‍के मराठी भाषा बोलली जात नाही.

काही मोजक्‍याच ठिकाणी लोक मराठी भाषा बोलतात. उर्वरित ठिकाणी लोक तेलुगू, गोंडी, माडीया, छतीसगडी व बंगाली भाषा बोलतात. त्यामुळे मराठी या प्रमाण भाषेतून मुलांना शिकविणे ही एक मोठी समस्या आहे.

राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार हे मागील महिन्यात गडचिरोलीला आले असता त्यांनी मराठी भाषेत मुले मागे असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावरील उपाययोजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. नंदकुमार यांच्याकडून प्रेरणा घेत डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे वळण्यासाठी शब्दकोश निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. बोलीभाषा निर्मितीबाबतचा गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे, हे विशेष. आतापासून पर्यवेक्षकीय यंत्रणेने बोलीभाषेची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन डॉ. रमतकर यांनी केले. जिल्हास्तर, तालुका, केंद्र व शाळास्तरावर शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करून शब्दकोशनिर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शाळास्तरावर पालक, व्यवस्थापन समिती, शिक्षक, मुख्याध्यापक, साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा सहभाग असतो. आता शाळास्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात विविध भाषेचे शब्दकोश व वाक्‍यरचना निर्माण केल्या जात असल्याने व शिक्षकांना बोलीभाषेतील शब्दकोश आता उपलब्ध होणार असल्याने त्यांना विद्यार्थ्यांना मराठी ही प्रमाण भाषा शिकविणे कठीण जाणार नाही. बोलीभाषा शब्दकोश निर्मितीकरिता डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांच्यासह डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. धनंजय चापले, डॉ. विनीत मते, डॉ. नरेश वैद्य, डॉ. विजय रामटेके प्रयत्न करत आहेत.

Web Title: the creation of start diet language dictionary