
जिल्ह्यातील तीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असतानाच त्यापैकी तालुक्यातील केवळ 3 हजार 69 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. हे घरकुल आपल्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांचे म्हणणे आहे.
वरुड (जि. अमरावती) ः केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. त्याबरोबरच घरकुलाच्या श्रेयवादाची लढाईही सुरू झाली. येत्या काळात हा श्रेयवादाची लढाई अधिक रंगतदार होणार असली तरी घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार काय असा सवाल करण्यात येत आहे.
हेही वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज
जिल्ह्यातील तीस हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असतानाच त्यापैकी तालुक्यातील केवळ 3 हजार 69 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. हे घरकुल आपल्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांचे म्हणणे आहे. तर घरकुल मीच मंजुर केल्याचा दावा करणाऱ्या देवेंद्र भुयार यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असे पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकातुन म्हटले आहे.
आमदार भुयार यांनी ग्रामपंचायत ब यादीतील लाभार्थ्यांची नावे मागवून स्वतःच्या लेटरपॅडवर मी घरकुल मंजूर केल्याचे सांगणारा मजकूर लिहून ते पत्र लाभार्थ्यांना पाठविले. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. अंमलबजावणी करिता ग्रामपंचायत, पंचायत समिती ते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचाच सहभाग असतो. त्यामुळे सरपंच, पं.स.सभापती, जि.प.अध्यक्ष व प्रशासन यांनाच या घरकुल बाबतीत पाठपुरावा करावा लागतो.
2020-21 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरकुल लक्षांक मंजूर झालेले आहे. त्याचप्रमाणे वरुड तालुक्याला एकूण 3069 लाभार्थ्यांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी 30 हजार 998 घरकुलाचा लक्षांक मंजूर आहे. घरकुल योजना ही दरवर्षाला सातत्यपूर्ण लक्षांक घेऊन पुढे चालत असते. या योजनेत आमदारांचा संबंध येत नसतानाही हे घरकुल त्यांनी मंजूर केल्याचा दावा न करता मतदारसंघात बरेच जनहिताची कामे असून ती कामे कशी पूर्ण करता येईल व नागरिकांना कसा न्याय देता येईल, याकडे लक्ष दिल्यास जास्त बरे होईल. असे विक्रम ठाकरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ