
५० लाखांची लाच : तीन अधिकाऱ्यांना अटक; सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
चंद्रपूर : उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना ब्रह्मपुरी येथील त्यांच्या घरून पन्नास लखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. त्यांच्यासोबत या प्रकरणात सहभागी असलेले नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील व चंद्रपुरातील मृद व जलसंधारण कार्यालयाचे विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनाही अटक करण्यात आली.
तक्रारदार नागपुरातील एका कंत्राटदार आहे. त्याने नागपूर व चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण कार्यालयात कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले होते. त्या कामाचे, तसेच उर्वरित बंधाऱ्यांच्या कामाच्या बिलाची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न ते करीत होते. त्यासाठी कविजीत पाटील, श्रावण शेंडे व रोहीत गौतम यांनी ८१ लाख २ हजार ५३६ रुपयांची लाच तक्रारकर्त्याला मागितली होती. लाच देण्याची तयारी नसल्याने कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ३) सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास श्रावण शेंडे यांना त्यांच्या ब्रह्मपुरी येथील निवासस्थानी ५० लाखाची लाच स्वीकारतांना अटक केली.
याचवेळी नागपूर व चंद्रपूर येथे कारवाई करून कवीजीत पाटील, विभागीय लेखाधिकारी रोहीत गौतम यांनाही अटक करण्यात आली. अटकेनंतर पाटील, शेंडे व गौतम या तिघांच्याही घराची झडती घेण्यात आली. बुधवारी (ता. ४) सायंकाळी या तिघांनाही चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना नऊ मेपर्यंत पोलिस कोठडीत मिळाली. ही कारवाई नागपुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
Web Title: Crime News Bribe Of 50 Lakh Three Officers Arrested Police Custody Until Monday Chandrapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..