
गडचिरोली : नक्षल्यांनी मजुरांना मारहाण करून केली ६ वाहनांची जाळपोळ
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षली सक्रिय झाले असून नक्षल्यांनी रस्ता कामावरील ६ वाहने व दोन मिक्सर मशीनची जाळपोळ करून ३ मजुरांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्राअंतर्गत विसामुंडी येथे येचली गावातील गणेश नागपूरकर या पेटी कॉन्ट्रैक्टरकडून रस्ता व पुलाचे काम सुरू असून वाहने आणि मजूर रस्ते निर्मितीच्या कामावर होते. बुधवारी रात्री २० ते २५ च्या संख्येने आलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी कामाच्या स्थळी जाऊन मजुरांना झोपेतून उठवून बेदम मारहाण केली. यात तीन मजूर जखमी झाले. तसेच रस्ता कामावरील एक जेसीबी, एक पोकलेन, दोन ट्रॅक्टर व दोन दुचाकींसह दोन मिक्सर मशीनवर डिझेल टाकून पेटवून दिले. रस्त्याचे काम बंद करा अशी धमकी देऊन नक्षली तिथून निघून गेले.
या जाळपोळीत कंत्राटदाराचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमी मजुरांना त्यांच्या सहकाऱ्यांनी भामरागड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केले. याप्रकरणी भामरागड पोलिसांनी अज्ञात नक्षलवाद्यांविरोधात जाळपोळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या भागात नक्षल शोध अभियान अधिक तीव्र केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील इरपनार तसेच एटापल्ली तालुक्यात रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेने कंत्राटदार तसेच ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Crime News India Naxals Beat Workers And Destroyed 6 Vehicles In Gadchiroli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..