
दररोज चालणाऱ्या नित्यक्रमातून माणूस आणि कावळ्यांच्या मैत्रीचे अनोखे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोक अनुभवत आहेत. ही कहानी आहे, शेकडो कावळ्यांची नियमित भूक भागवणाऱ्या रहीमभाईंची.
नेर (जि. यवतमाळ) : सकाळी सात वाजताची वेळ, गुलाबी थंडी अन् दवबिंदू, असे अल्हाददायक वातावरण असताना यवतमाळवरून नेरकडे येणाऱ्या ट्रकचा हॉर्न वाजताच शेकडो कावळ्यांच्या थवा अचानक 'त्या' ट्रकवर येऊन बसतो. भुकेने व्याकूळ शेकडो कावळे दाण्यांसाठी अक्षरशः अंगाखांद्यावर खेळतात. त्या कावळ्यांच्या डोळ्यात असते फक्त 'रहीमभाई'च्या आगमनाची आस.
दररोज चालणाऱ्या नित्यक्रमातून माणूस आणि कावळ्यांच्या मैत्रीचे अनोखे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोक अनुभवत आहेत. ही कहानी आहे, शेकडो कावळ्यांची नियमित भूक भागवणाऱ्या रहीमभाईंची. रहीमभाईचा ट्रक वेगाने निघून जातो, तेव्हा हे कावळेही त्यांच्या ट्रकचा पाठलाग करतात. जणू त्यांचे नाते वर्षानुवर्षाचे असावे.
हेही वाचा - धक्कादायक! तब्बल नऊशेवर बालक कुपोषणाच्या छायेत; नागपूर...
पक्ष्यांनासुद्धा मन आणि भावना असतात. पशुपक्ष्यांशी असलेले माणसाचे नाते काही नवीन नाही. पोपट, कबुतर आदी पक्षी तर जणू घरातील एक भाग होऊन बसलाय. कावळा हा पक्षी श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या संकल्पना रेषेवर कायम मनाच्या कोपऱ्यात अस्पृश्य राहिलेला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेला पायदळी तुडवत त्यांच्यावर प्रेम करीत त्यांची भूक नियमितपणे भागवणाऱ्या रहीम भाई यांची कहानी काही औरच आहे.
यवतमाळ येथील कळंब चौकातील मिर्झा रहीम बेग यांचा गेल्या पंधरा वर्षांपासून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. यवतमाळ नेर रोडलाईनवर अनेक वर्षांपासून त्यांची गाडी धावत आहे. रोज सकाळी सहा वाजता यवतमाळ येथून ट्रान्सपोर्टचा माल घेत त्यांचा ट्रक नेरकडे निघतो. यवतमाळ ते नेर दरम्यान एकदम मधोमध मालखेड शिवारासमोर उंच टेकड्यावर रहीमभाईचा ट्रक जेव्हा कुच धरू लागते तेव्हा शेकडो कावळ्यांच्या थवा त्यांच्या ट्रकमागे पाठलाग करतो. हा प्रकार पंधरा वर्षांपासून दररोज सुरू आहे. यवतमाळ-अमरावती रोडवर शेकडो वाहने धावत असताना नेमके त्याच ठिकाणी रोज जेव्हा नियमित वेळेत रहीम भाईचा ट्रक येतो, तेव्हा त्यांच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज एकूण असंख्य कावळे जमा होतात. पक्षीप्रेमी असलेले रहीम भाई दररोज त्यांना घरून खिचडी बनवून आणतात. कधी शेव, पापडी, बिस्कीट, खाऊ काढेपर्यंत लहानमुलांप्रमाणेच कावळ्यांनाही धीर नसतो. काही वेळेस तर त्यांच्या हातातून खाऊ पळवितात. अवघ्या काही मिनिटात आणलेला खाऊ संपतो. चक्क त्यांच्या अंगाखांद्यावर कावळ्यांच्या थवा खेळताना अनेकांनी अनुभवला आहे. रहिमभाई आणि कावळ्यांचा हा मुकसंवाद मानवी भावनांचा एक नवा उत्सव असतो.
हेही वाचा - शेतकऱ्यांनो, पुढील हंगामात पेरणीसाठीही मिळणार नाही सोयाबीन; आतापासूनच करा सोय
बालकांनाही ओढ -
यवतमाळ ते नेर दरम्यान येणाऱ्या लासिना, उत्तरवाढोना, सोनवाढोना, मालखेड, कोलुरा येथील लहान बालकांना देखील रोज सकाळी नियमित वेळेत रहीम भाईच्या ट्रकची ओढ असते. पक्षांप्रमाणे लहान बालकांना रहीमभाई रोज बिस्किटे वाटत येतात. गावालगत त्यांचा ट्रक येताच रहीम भाई हॉर्न वाजवून बालकांना सिग्नल देतात. त्यांचा गाडीचा आवाज ओळखून अनेक लहान मुले रस्त्याच्या कडेला उभे असतात.