अलिकडे भरत नाही कावळ्यांची शाळा! संख्याही झाली कमी, हरवतेय "काव काव'

crow.
crow.

गडचिरोली : प्रत्येकाला आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या पक्षाची ओळख होत असेल, तर ती काऊ-चिऊची. त्यातही चिमणी साधीभोळी आणि कावळा चतुर, कपटी रंगविण्यात आला आहे. पण, हा हरहुन्नरी पक्षी अतिशय अनोखा असून अनेक वर्षांपासून मानवाशी जुळवून घेतो आहे. पण, मागील काही वर्षांत त्यांचीही संख्या घटायला लागली आहे.

पूर्वी वड, पिंपळासारख्या मोठ्या वृक्षांवर किंवा उंच इमारतींवर कावळे एकत्र येत सारखे "काव काव' करीत अधूनमधून आकाशात उडायचे. याला "कावळ्यांची शाळा' म्हणण्याचा प्रघात होता. आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मानवी शाळा बंद झाल्याची चर्चा प्रत्येकजण करीत असताना कावळ्यांच्या शाळा काही वर्षांपूर्वीच बंद झाल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही.

पक्षी वर्गाच्या काक-कुलातील कावळा हा सर्वांचा परिचित पक्षी आहे. कावळ्याच्या अनेक जाती असून दक्षिण अमेरिकेचा अपवाद सोडून जगात सर्वत्र कावळे दिसून येतात. भारतात गावकावळा किंवा घरकावळा (हाउस क्रो) व डोमकावळा किंवा रानकावळा (जंगल क्रो) या दोन प्रजाती आढळून येतात. घरकावळ्याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस स्प्लेंडेन्स आणि डोमकावळ्याचे कोर्व्हस मॅक्रोऱ्हिंकस आहे. चिऊ-काऊच्या कथेतून भेटणारा कावळा पूर्वी सर्वत्र दिसायचा. सर्वांना कंटाळा येईपर्यंत काव काव करायचा. पावसाळा हा कावळ्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात कावळे मोठ्या संख्येने एका ठिकाणी एकत्र येतात. मग, त्यातील काही कावळे आकाशात झेपावत विविध प्रकारच्या हवाई कसरती करतात.

हा सगळा खटाटोप मादी अर्थात कावळीणीला आकृष्ट करण्यासाठी असतो. शिवाय यातून उड्डाणातील बारकावे शिकायला लहान कावळ्यांना मदत होते. त्यामुळे ही एक प्रकारची कावळ्यांची शाळाच असते. पण, आता कावळे दिसणे दुर्मिळ झाले आहे. कावळ्यांच्या या अनोख्या शाळाही दुर्मिळ झाल्या आहेत. एकेकाळी मानवाच्याच वळचणीला राहणारी चिमणी त्याच्यापासून दुरावली. त्याचे उष्टे, खरकटे खाणारा, त्याच्या घरावर बसून ओरडत पाहुणे येणार असल्याचे शुभवर्तमान सांगणारा कावळाही आता परका झाला आहे. या परिस्थितीला मानवी चुकाच जबाबदार आहेत. सध्या कावळ्यांची संख्या इतकी झपाट्याने कमी होतेय की, पिंडाला शिवायलासुद्धा कावळा येत नाही, असेही अनेकजण म्हणतात. त्यामुळे या पक्ष्यांच्या ऑनलाइन नव्हे, तर खऱ्याखुऱ्या शाळा भराव्यात, यासाठी मानवानेच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हरफनमौला, तरीही भोळा
खरेतर एकाच डोळ्याने मान तिरकी करून मिश्‍किलपणे बघणारा कावळा एकाक्ष म्हणूनही ओळखला जातो. हा अनेक गुण असलेला हरफनमौला पक्षी आहे. कावळ्याची चोच निसर्गाने अशी तयार केली आहे की, तो उंदरासारखे प्राणी फाडून खाऊ शकतो, फळे खाऊ शकतो आणि चक्‍क लहानग्या शिंजिर पक्ष्यासारखा आपली चोच आत घालून सावर किंवा पळसाच्या फुलांतील मधसुद्धा पिऊ शकतो. अतिशय सावध, चाणाक्ष आणि चतुर असा हा पक्षी असला, तरी दरवर्षी कोकीळ त्याला फसवून त्याच्या घरट्यात आपली अंडी घालतो. त्यामुळे हरफनमौला असला, तरी कावळा भोळासुद्धा आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com