राज्यपालांच्या दत्तक तालुक्‍यात भ्रष्टाचार,कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले रस्ते अदृष्य

road
road

गडचिरोली : विकासकामातून दुर्गम गावांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्‍याला भ्रष्टाचाराचा सुरुंग लागला आहे. मंजूर झालेली कामे न करताच "त्या" कामांचे कोट्यवधी रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली असून कंत्राटदाराला कागदोपत्री मदत करणारे अधिकारी व कर्मचारी अडचणीत आले आहेत. प्रत्येक गावाचा विकास व्हावा व पक्‍के रस्ते बांधून गावखेडे शहरांना जोडले जावे, या हेतूने शासनामार्फत भामरागड तालुक्‍यातील दुर्गम भागात आदिवासी उपाययोजनेअंतर्गत 2019-20 मध्ये 3054 योजनेअंतर्गत 28 लाख 75 हजार 871 खर्च करून मडवेल्ली -सिपनपल्ली रस्त्याचे बांधकाम झाल्याचे दाखविण्यात आले तर 34 लाख 51 हजार 844 हिंदेवाडा-पिटेकसा तसेच हिंदेवाडा-इरपनार रस्त्यासाठी 12 लाख 94 हजार 098 रुपये खर्च करण्यात आले.
या तीनही रस्त्यांच्या कामाचे कंत्राट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुतरमारे यांनी घेतले होते. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बाब उघड झाली आहे. संबंधित कामे 18 टक्के बिलो घेऊनसुद्धा काम पूर्ण न करताच कंत्राटी किमती पेक्षाही जास्तीचे बिल अदा केल्याची धक्कादायक बाब पुढे आली. पदाचा गैरवापर करून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी प्रशासनाने सुरू केली असून तक्रार झालेल्या कामांची पाहणी करून भामरागड येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सोमवारी (ता. 8) जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला आहे.
या अहवालात काय आहे आणि रस्ता बांधकामाबाबत कोणाला जबाबदार धरले. याचा उलगडा कारवाईतच पुढे येईल. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या चौकशीकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे. भामरागड तालुक्‍यात दुर्गम भागात काही ठिकाणी काम पूर्ण न करताच लाखो रुपयांची देयके मंजूर करण्यात आली. मात्र, मंजूर निधीपेक्षा जास्तीची काढण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले.
भामरागड तालुक्‍यात गोटुल, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, गावातील रस्ते, नाल्या तसेच पुलाच्या कामात गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची ओरड सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करून अनेकांवर कारवाई केली होती. मात्र, यानंतरही बोगस कामे सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
तांत्रिक कारणामुळे कामे शिल्लक
भामरागड तालुक्‍यातील ज्या कामाबद्दल तक्रार करण्यात आली, त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही तांत्रिक कारणामुळे शिल्लक आहेत. कामाच्या व्यापामुळे प्रत्यक्षात साइटवर जाऊ शकलो नाही. उर्वरित कामे संबंधित एजंसीकडून करवून घेतली जातील. त्यांनी कामे न केल्यास बिलो व सेक्‍युरीटीचे अठरा ते वीस लाख रुपये काम पूर्ण करण्यासाठी खर्च करण्यात येतील.
बोधावार, उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, एटापल्ली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com