ना ‘व्हेंटिलेटर’, ना ‘अतिदक्षता’

केवल जीवनतारे
बुधवार, 24 एप्रिल 2019

डागाची रेफर करण्याची ‘खेळी’ 
डागा रुग्णालयात बाळंतपणादरम्यान अचानक प्रसूत मातेची प्रकृती बिघडल्यास ‘थेट’ मेडिकलमध्ये रेफर करण्यात येते. दर दिवसाला तीन ते चार मातांना रेफर केले जोते. यामुळेच डागा रुग्णालयात मातामृत्यूंची नोंद होत नाही. तर ते मृत्यू मेडिकलच्या नोंदीत येतात. अशी खेळी डागा प्रशासनातर्फे खेळली जाते. विशेष असे की, डागात एकही व्हेंटिलेटर नाही, त्याचप्रमाणे एमडी मेडिसीन पदवीधर असलेले ‘फिजिशियन’ नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

नागपूर - दरवर्षी सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात ‘ना व्हेंटिलेटर आहे, ना अतिदक्षता विभाग’, अशी दयनीय अवस्था येथे आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत झालेल्या मातेवर वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग नसल्यामुळे ‘रेफर’ करण्याचे धोरण डागातून बिनदिक्कतपणे राबवले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. 

डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयात दरवर्षी १६ हजारांवर प्रसूती होतात. नैसर्गिक बाळंतपणाची डागा रुग्णालयात महिलांसाठी ही सोय असली तर अचानक प्रकृती बिघडण्याचे प्रकार वारंवार रुग्णालयात होतात. अशावेळी प्रसूतीचा अतिदक्षता विभाग नसल्यामुळे प्रसूतिकाळात गुंतागुंत झाल्यास तत्काळ मेडिकल किंवा मेयो रुग्णालयात रेफर केले जाते. यामुळे प्रसूत महिलांचा जीव धोक्‍यात येतो. नव्हेतर दरवर्षी अशा घटना डागामध्ये घडतात.  

प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंतीतून होणाऱ्या मातामृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी एक सुसज्ज अतिदक्षता विभाग उभारणे आवश्‍यक आहे. मात्र ‘सेकंडरी स्तरा’वरील डागा रुग्णालय असल्याचे कारण पुढे करीत, यातून पळवाट काढण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असलेले डागा रुग्णालय आघाडीवर आहे. प्रसूतीदरम्यान होणारे मातामृत्यू ही तशी जागतिक समस्या आहे. प्रसूतीच्या गुंतागुंतीतून मातेच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने धोक्‍याची जाणीव करून दिली आहे. मातामृत्यू कमी करण्याचे उद्दिष्टही निश्‍चित करून देण्यात आले. यानुसार देशात काही वर्षांत प्रगती झाली असली, तरी आजही प्रत्येक तासाला भारतात प्रसूतीदरम्यान ५ महिलांचा मृत्यू होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनातर्फे डागा शासकीय स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयात अतिदक्षता कक्ष उभारण्याची गरज आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क झाला नाही.

डागा रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला अपयश आले आहे. अद्याप प्रसूतीचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यासंदर्भात प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात सादर केला नाही. तर राज्याकडे प्रस्ताव कसा जाईल? डॉक्‍टरांची संख्याही तोकडी आहे.
- त्रिशरण सहारे, सचिव, इंटक, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daga Hospital Issue No Ventilator No Emergency Ward