जलयुक्तच्या निकृष्ट बांधकामामुळे फुटले दोन बंधारे...२५ एकरांतील शेतीपिकांचे नुकसान

विश्‍वपाल हजारे
Tuesday, 25 August 2020

परसोडी नाग. येथे २०१९-२०२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले होते. परसोडी-आथली या नाल्यावर दोन ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी हे काम करण्यात आले. कंत्राटदाराने बांधकाम पूर्ण न केल्याने नाल्याला पूर येऊन अवघ्या दोन महिन्यांतच दोन्ही बंधारे फुटले.

लाखांदूर (जि. भंडारा) : जलयुक्त शिवार योजनेतून दोन कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले. त्यातही बांधकाम अर्धवट राहिल्यामुळे पावसाळ्यात बंधारे फुटले, अशी प्रतिक्रिया लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी फुटलेल्या बंधाऱ्यांची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली. यामुळे गावकऱ्यांकडून होत असलेल्या निकृष्ट बांधकामाच्या आरोपाला बळ मिळाले आहे.

अभियंत्यांनी तालुक्‍यातील परसोडी नाग. येथील फुटलेल्या सिमेंट बंधाऱ्याची २० ऑगस्टला पाहणी केली. प्राप्त माहितीनुसार, तालुक्‍यातील परसोडी नाग. येथे २०१९-२०२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले होते. परसोडी-आथली या नाल्यावर दोन ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी हे काम करण्यात आले. अंदाजपत्रकानुसार या सिमेंट बंधाऱ्याचे कॉक्रिटिंग, जॅकेटिंग व दुतर्फा पाळीचे दगडाने पिचिंग करावयाचे होते, अशी माहिती संबंधित कामाचे अभियंता रंगारी यांनी दिली.

पिकांचे मोठे नुकसान

मात्र, कंत्राटदाराने बांधकाम पूर्ण न केल्याने नाल्याला पूर येऊन अवघ्या दोन महिन्यांतच दोन्ही बंधारे फुटले. या घटनेत परसोडी येथील महादेव ठाकरे यांच्या शेतातील धानाचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. तसेच इतर पाच ते सात शेतकऱ्यांच्या जवळपास २५ एकरांतील पिकाचे नुकसान झाले.

दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार

या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. त्यानंतर लघू पाटबंधारे विभागाच्या साकोली उपविभागाचे अभियंता रंगारी यांनी परसोडी परिसरातील बंधाऱ्याची पाहणी व चौकशी केली. सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तालुक्‍यात चर्चा आहे. आता विभागाकडून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाणून घ्या : त्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर केली आदर्श गावाची निर्मिती अन् मिळविला हा पुरस्कार...

माहिती देण्यास टाळाटाळ

बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी केल्यावर श्री. रंगारी यांना विचारणा केली असता दोन महिन्यांपूर्वी या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामासाठी शासनाने केवळ १२ लाख १८ हजार ४६१ रुपयांचा निधी मंजूर केला होता. बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट शिल्लक असून निधीसुद्धा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत झालेल्या बांधकामावर किती खर्च झाला? उर्वरित काम कधी होणार? याबाबत त्यांनी माहिती देणे टाळले.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to crops on 25 acres due to inferior dams bursting