नुकसानच नुकसान! पश्‍चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा ओला दुष्काळ

heavy rain.
heavy rain.

अमरावती : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अतिपावसामुळे मूग व उडीद हातून गेल्यानंतर सोयाबीनलाही फटका बसला आहे. कापसावरही आता गुलाबी बोंडअळीचे आक्रमण होऊ लागल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होऊन शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम आर्थिक अडचणीत आणणारा ठरण्याची शक्‍यता आहे.

यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी लवकर आटोपली. पश्‍चिम विदर्भात सोयाबीन व कापूस हे मुख्य पीक असून आंतरपीक म्हणून तूर, मूग व उडदाची पेरणी केली जाते. यावर्षी विभागात १० लाख ५८ हजार ७९५ हेक्‍टर कापूस तर १४ लाख १५ हजार ५९० हेक्‍टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली आहे. मुगाखाली ६८ हजार ४८४ हेक्‍टर तर उडदाखाली ५० हजार ४३४ हेक्‍टर क्षेत्र आहे. तुरीची पेरणी ४ लाख ३ हजार ४०५ हेक्‍टर क्षेत्रात आहे. अतिपावसामुळे मूग व उडदाची अपरिमित हानी झाली आहे.

मूग व उडदाचे मुख्य उत्पादक असलेल्या वऱ्हाडातील खारपाणपट्ट्यातील काही भागांत मुगाची उत्पादकता सरासरी २५ किलो प्रती हेक्‍टरी आली आहे. सोयाबीनवर चक्रिभुंगा, यलो मोझॅकने आक्रमण केल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने अमरावती जिल्ह्यात ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रातील सोयाबीन पूर्ण उद्‌ध्वस्त झाल्याचा अहवाल दिला आहे.

पश्‍चिम विदर्भात गेल्या चार-पाच वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. सद्यःस्थितीत कपाशी बोंड अवस्थेत आहे. मॉन्सूनपूर्व किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या कपाशीवर जुलै आणि ऑगस्टमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नुकसान पातळीवर दिसून आला. सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापासून ते ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यातील वातावरण पोषक आहे. पुढे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त वाढून मोठे नुकसान होण्याची शक्‍यता अधिक आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक! महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा

१५ सप्टेंबरपासून पश्‍चिम विदर्भात परतीचा पाऊस सुरू आहे. अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात तर विविध भागांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी थांबले आहे. अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. संततधार पाऊस व ढगाळ वातावरणाचा सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पश्‍चिम विदर्भात अतिपावसामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून, किडींचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. जास्त पावसामुळे मूग, उडीदचे हातचे पीक गेले, तर तूर व कपाशीची बोंडे सडायला लागली आहेत. हायब्रीड ज्वारीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अस्मानी संकटाने हतबल झाला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com