कारंजा शहरात भरदिवसा घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कारंजा घाटगे (जि. वर्धा) : शहरात गुरुवारी (ता.3) दुपारच्या सुमारास खैरी पुनर्वसनमधील बंद घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली.

कारंजा घाटगे (जि. वर्धा) : शहरात गुरुवारी (ता.3) दुपारच्या सुमारास खैरी पुनर्वसनमधील बंद घरात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली.
शिक्षक तीरणदास काशिनाथ देशमुख नोकरीवर, तर त्यांची पत्नी मुलीला घेऊन नागपूर येथे गेली होती. दुसरी मुलगी शाळेत गेली होती. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा दर्शनीय दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील रूममधील दोन लोखंडी कपाट तोडून त्यातील रोख सात हजार, गळ्यातील साखळी, अंगठी यासह इतर सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सायंकाळी दरवाजा तोडल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांनी देशमुख यांना भ्रमणध्वनी करून माहिती दिली. देशमुख घरी आले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. तीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. घटनास्थळी ठाणेदार राजेंद्र शेटे यांनी पाहणी केली.
कारंजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. कारंजा शहर महामार्गावर वसले असून येथे दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत. काही दिवसांपूर्वी चौधरी यांच्या घरात भरदिवसा चोरीची घटना घडली होती. त्याची अजूनही चौकशी झाली नसताना दुसरी चोरी आली. यावरून कारंजा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A day-long burglary in the city of Carranza