गौराळा तलावातील जलजीवांचा मृत्यू; चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे.

भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे.
गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. ही बाब ईको-प्रोचे तालुकाध्यक्ष संदीप जीवने यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याधिकारी श्री. बन्नोरे यांना माहिती दिली. तसेच सदर प्रकरणाची चौकशी करून पर्यावरण विभागाला पाचारण करण्याची मागणी केली. मात्र, सदर तलाव खासगी असल्याने चौकशी करू शकत नाही. मात्र साफसफाई करून देऊ असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. तलावात साचलेला कचरा, प्रदूषण, गौरी-गणपती विसर्जन तसेच शिंगाडा शेतीकरिता होणारी औषध फवारणी हे सर्व जलजीव मृत्यस कारणीभूत असण्याची शक्‍यता जीवने यांनी वर्तविली आहे.
तलावातील पाण्याचे व मृत जलजीवांचे नमूने गोळा करून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासून घ्यावे. भविष्यात या तलावातील प्रदूषणकारी घटक कसे टाळता येईल, याबाबत स्थानिक प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे ईको-प्रोने केली आहे. तलावातील जलजीव मृत होणे म्हणजे तलावाची जैवविविधता संकटात आहे. जैवविविधता अधिनियम 2002, महाराष्ट्र राज्य जैवविविधता नियम 2008 नुसार अशा तलावांचे आणि जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यास पालिकास्तरावर जैवविविधता समिती स्थापन करणे, गरजेचे असल्याचे मत जीवने यांनी व्यक्त केले आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी करणार पोलिसांत तक्रार
वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती म्हैसेकर यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली. मृत कासव, मासोळ्या गोळा केल्या. तलावात मासोळ्या पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत अडकल्याने तसेच कालच्या मुसळधार पावसाने मासोळ्या व कासव मृत झाले आहेत. पाण्यात विषारी तत्त्व नाहीत. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of aquatic life in Lake Gurala; Order for Inquiry