यवतमाळमधील पंतप्रधानांच्या सभेत पाण्याअभावी विद्यार्थिनीचा मृत्यू

अरुण डोंगशनवार
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पांढरकवडा येथे शनिवारी आयोजित स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना राहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावल्याने तिला आधी पांढरकवडा येथील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले.

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : येथे गेल्या शनिवारी (ता. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (ता. 20) सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12, रा. शिवाजी वॉर्ड पांढरकवडा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

क्षितिजा ही येथील जिल्हा परिषदेच्या विद्यालयात सातवीत शिक्षण घेत होती. पांढरकवडा येथे शनिवारी आयोजित स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वॉर्डातील काही महिला सकाळी आठलाच ऑटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितिजा, तिची आई सुनीता व सातवर्षीय भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. या मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यातच सकाळी 11 ची सभा असल्याने ऊनही होते. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक महिलांचा जीव कासावीस झाला होता. घसा कोरडा पडत असताना दूरदूरपर्यंत पाणी दिसेनासे झाले. त्यातच गर्दी असल्याने तेथे अडकलेल्या महिलांना बाहेर निघणेही कठीण होते. कुणी निघण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलिसांकडून आडकाठी आणली जात होती.

सुरक्षेच्या कारणावरून ‘जागीच बसून रहा’, असे फर्मान पोलिसांकडून सोडले जात होते. महिलांना पाच ते सात तास पाण्याविना राहावे लागले. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावल्याने तिला आधी पांढरकवडा येथील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर उपचार सुरू असतानाच काल बुधवारी सकाळी क्षीतिजाची प्राणज्योत मालवली. 

पांढरकवडा येथे अंत्यसंस्कार -
क्षीतिजाच्या पार्थिवावर आज गुरुवारी (ता. 21) दुपारी पांढरकवडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. क्षितिजा ही मूळची नांदेड जिल्ह्यातील होती. तिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वीच कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर क्षीतिजाची आई ही मुलांसह माहेरी पांढरकवडा येथे राहायला आली. क्षीतिजाच्या आईला आजोबांनी घर बांधून दिले व घरीच छोटेसे किराणा दुकान लावून दिले. क्षितिजाचा मामा विनोद पेंटावार पांढरकवडा येथे पानटपरी चालवितो. क्षीतिजाच्या निधनाने शिवाजी वॉर्डात शोककळा पसरली आहे.

 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
 

Web Title: Death of a girl student in Modis meeting in yavatmal vidarbha