शस्त्रक्रिया टेबलावर रुग्णाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर ः सकाळची वेळ. मेडिकलच्या अस्थिरोग विभागाच्या शस्त्रक्रियागृहात हिप (कमरेचे हाड) प्रत्यारोपण सुरू होते. ही शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक 62 वर्षीय महिला रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद पडले. रुग्ण दगावला असल्याचे कळताच मेडिकलमधील या शस्त्रक्रिया गृहातील डॉक्‍टरांमध्ये एकच खळबळ उडाली. डॉक्‍टरांनी टेबलवर असलेल्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. छातीवर दाब देत कृत्रिम श्‍वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर डॉक्‍टरांनी दोन तासांनंतर महिलेला मृत घोषित केले.

मेडिकलमध्ये दगावलेल्या महिलेचे नाव छाया (बदललेले नाव) असे आहे. या महिलेस चालता येत नव्हते. डॉक्‍टरांकडून कमरेतील हाडाचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. या महिलेस उच्च रक्तदाब होता. मात्र शस्त्रक्रियेस तयार असल्यामुळे नियमानुसार ठरल्याप्रमाणे तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. मेडिकलच्या अस्थिरोग विभागात दाखल करून घेतले. 17 सप्टेंबरला सकाळी शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्‍टरांकडून रुग्णाच्या रक्तदाबासह इतरही वैद्यकीय तपासणी केली गेली. सर्व चाचण्या नियंत्रणात होत्या. रुग्णाचे वय आणि इतर वैद्यकीय क्षमता बघता तिला बधिर करण्याचे इंजेक्‍शन देण्यात आले. डॉक्‍टरांच्या पथकाने रुग्ण महिलेच्या कमरेला चिरा देऊन प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू केली. दीड तासापर्यंत शस्त्रक्रिया योग्य सुरू होती. परंतु अचानक रक्तदाब वाढला आणि रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी होऊ लागले. कृत्रिम श्‍वास देण्याचा प्रयत्न केला. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया थांबवली. सीआरटी देऊन हृदयाचे स्पंदन पुन्हा आणण्यासाठी दीड तास प्रयत्न केले. रुग्णाला शस्त्रक्रियागृहाच्या बाजूला असलेल्या रिकव्हरी खोलीत हलवण्यात आले. येथेही दीड ते दोन तास प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. नातेवाइकांकडून मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. परंतु लेखी तक्रार दिली गेली नाही. तर मेडिकलच्या डॉक्‍टरांकडून हृदयविकाराच्या आकस्मिक धक्‍क्‍याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

मृत्यूचे व्हावे विश्‍लेषण
अचानक या महिलेचा मृत्यू शस्त्रक्रियेच्या टेबलवर झाला. यामुळे या मृत्यूच्या एकूणच तपासणी तसेच शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर, बधिरीकरण तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाच्या डॉक्‍टरांच्या उपस्थितीत हे विश्‍लेषण व्हावे, असे एका डॉक्‍टरने नाव न सांगण्याच्या अटीवर मत व्यक्त केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of a patient at the surgery table