विकासकामांच्या श्रेयासाठी राजनगरीत रंगतोय कलगीतुरा, आजी-माजी आमदारांमध्ये जुगलबंदी सुरू

aatram
aatram

अहेरी(जि. गडचिरोली) : अहेरी विधानसभा क्षेत्रातील लॉकडाउनमुळे अडलेले भूमीपूजन, लोकार्पण कार्यक्रम आता अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर सुरू झाले आहेत. मात्र, बरीच कामे मागील सरकारची असून लोकार्पण नव्या सरकारातील आमदार करीत असल्याने सध्या माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार व जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये श्रेयासाठी कलगीतुरा रंगताना बघायला मिळतो आहे.

सध्या सुरू असणारे बहुतांश कार्यक्रम मागील सरकारने मंजुर केलेल्या विकासकामांचेच आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर बराच कालावधी सत्तास्थापनेच्या नाट्यामध्येच गेला. महाआघाडी सरकार स्थापन होऊन ऍक्‍शन मोडमध्ये येत नाही तोवर कोरोनाचे संकट उभे ठाकले. त्यामुळे नव्या महाआघाडी सरकारची या भागासाठी अद्याप कोणतीही विकासकामे रीतसर मंजुर नाहीत. मात्र मागील शासनाची मोठ्या प्रमाणातली विकासकामे मंजुर असूनही लोकसभेच्या आचार संहितेपासून थांबली होती. सध्याच्या स्थितीत महाआघाडी शासनाच्या नवीन विकासकामांना मंजुरी मिळेपर्यंत मागील शासनाच्या कामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमांवरच विद्यमान आमदारांना भागवावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 10 वर्षांनंतर विद्यमान आमदारांना संधी दिली तर माजी पालकमंत्र्यांना पहिल्यांदा व माजी आमदारांना सलग दुसऱ्यांदा पराभवास सामोरे जावे लागले. बदललेल्या परिस्थितीत मागील शासनाच्या विकासकामांचे भूमीपूजन, उद्‌घाटन प्रोटोकॉलनुसार विद्यमान आमदार करीत आहेत. त्यात उतावीळ कार्यकर्ते संपूर्ण श्रेय लाटण्याच्या धडपडीत अवाजवी माहिती पसरवीत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राज्यमंत्री दर्जाचे असल्याने या कार्यक्रमांची संधी मिळावी म्हणून माजी आमदार गटाकडून सुद्धा जोर लावण्यात येत आहे, तर माजी पालकमंत्री गटाचे कार्यकर्ते आपल्या कामांचे श्रेय इतरांना कशाला, यासाठी श्रेयवादाच्या लढाईत पुराव्यानिशी उतरण्याच्या तयारीत आहेत. समाजमाध्यमांवर मात्र तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोजच्या रोज चर्चा रंगत आहे. श्रेयवाद रंगतांना अहेरीकरांचे मात्र मनोरंजन होत आहे. कुठले काम कुणाचे आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे फक्त विकासकामांचा दर्जा चांगला असावा एवढीच रास्त मागणी जनतेची आहे.

सविस्तर वाचा -  मला कोरोना झाला तर?

काम महत्त्वाचे
अहेरी विधानसभा क्षेत्रात राजकीय नेतृत्वात बदल झाले असले, तरी या विधानसभा क्षेत्राचा फारसा विकास झाल्याचे दिसून येत नाही. प्रत्यक्ष राजनगरी अहेरीतही अनेक समस्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेचा आनंद घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केवळ एखाद दुसऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी विकासाचा वेग वाढवून त्यादृष्टीनेच काम करणे नागरिकांसाठी गरजेचे आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com