"त्या दोघी' अन्‌ बासरीचे सूर !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता चटर्जी यांचे सादरीकरण नागपूरकरांची रसिकता समृद्ध करून गेले. जवळपास दोन तास त्या दोघी आणि बासरीचे सूर हे एकमेव समीकरण कालिदास समारोहात अनुभवायला मिळाले.

नागपूर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता चटर्जी यांचे सादरीकरण नागपूरकरांची रसिकता समृद्ध करून गेले. जवळपास दोन तास त्या दोघी आणि बासरीचे सूर हे एकमेव समीकरण कालिदास समारोहात अनुभवायला मिळाले.

सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोहाचा तिसरा दिवस बासरीवादन आणि डॉ. नीना प्रसाद यांच्या शास्त्रीय नृत्याने गाजला. सुरुवात झाली ती "फ्ल्युट सिस्टर्स'च्या सादरीकरणाने. देबोप्रिया-सुचिस्मिता यांनी राग बागेश्रीने मैफलीला सुरुवात केली. पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये बासरीच्या सुरांनी सभागृहाचा ताबा घेतला होता. त्यानंतर युवा तबलावादक ओजस अढिया यांनी साथ केली. ओजस यांच्यासोबत पहिल्यांदाच रंगमंचीय सादरीकरण करीत असल्याचे दोघींनीही स्पष्ट केले. त्यातही कार्यक्रमापूर्वी त्याच्यासोबत तालीमही केलेली नव्हती. त्यामुळे एका अर्थाने तिन्ही कलावंतांच्या समन्वयाचा कस लागणार हे निश्‍चित होते. पण, अतिशय सुरेख पद्धतीने हा समन्वय साधत प्रत्येक टप्प्यावर रसिकांकडून टाळ्यांची दाद त्यांनी मिळवली. त्यानंतर रसिकांनी राग किरवाणीचा आग्रह धरला. मात्र, हंसध्वनी हा दाक्षिणात्य राग ऐकविणे त्यांनी पसंत केले. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत रसिकांचा "राग किरवाणी' कायम होता. तरी मिश्र पिलूने सांगता करीत देबोप्रिया व सुचिस्मिताने रसिकांच्या मनात घर केले. संपूर्ण सादरीकरणानंतर पाच मिनिटे सतत टाळ्यांचा कडकडाट करीत तिन्ही कलावंतांना रसिकांनी दाद दिली. त्यानंतर डॉ. नीना प्रसाद यांच्या शास्त्रीय नृत्याने समारोहाची रंगत वाढवली.

तत्पूर्वी, प्रसिद्ध उद्योजक बसंतलाल शॉ, न्यायाधीश भूषण गवई, परिअम्मा थॉमस आणि विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या उपस्थितीत कलावंतांचे स्वागत झाले. गेल्या तीन दिवसांपासून रेणुका देशकर आणि जैनेंद्र सिंह यांनीदेखील आपल्या खास शैलीतील निवेदनाची छाप रसिकांवर सोडली.

गडकरींच्या उपस्थितीत आज समारोप
केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवार) कालिदास समारोहाचा समारोप होणार आहे. या वेळी कलावंतांचा सत्कारही त्यांच्या हस्ते होईल. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही नितीन गडकरी यांनी समारोपाला हजेरी लावून शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतला होता.

"फ्ल्युट सिस्टर्स'
देबोप्रिया व सुचिस्मिता या दोघीही सख्ख्या बहिणी. अलाहाबाद येथील संगीताची पार्श्‍वभूमी असलेल्या सुप्रसिद्ध कुटुंबात रॉबिन व क्रिष्णा चटर्जी या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. पालकांनीच दोघींनाही बासरीवादनासाठी प्रोत्साहन दिले. वडील रॉबीन यांच्या व्यवसायाच्या बांधीलकीमुळे चॅटर्जी कुटुंबीयांना काही काळ अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. बासरीवादनाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांनी मुलींच्या डोळ्यात बघितले. भारतात परतल्यावर पं. भोलानाथ प्रसन्ना यांच्याकडे दोघींनीही बासरीचे शिक्षण घेतले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. प्रारंभिक शिक्षण पूर्ण झाल्यावर नेदरलॅंडमध्ये त्यांना न्युफीक शिष्यवृत्ती मिळाली. रॉटरडॅम कॉन्झरवेटरीमध्ये 1998 ला त्यांनी जागतिक संगीताचा अभ्यास केला. भारतात परतल्यावर 2001 मध्ये अलाहाबाद येथे त्यांनी "संगीत प्रभाकर' हे पदवी संगीत शिक्षण पूर्ण केले. गुरू पं. हरिप्रसाद चौरसिया यांना जगभरातील महोत्सवांमध्ये दोघीही साथ करतात, हे विशेष.

प्रतिभासंपन्न नृत्यांगना डॉ. नीना प्रसाद
डॉ. नीना प्रसाद या संशोधक व शिक्षका आहेत. स्वतःच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या अतिशय समर्थपणे पार पाडताना त्यांनी कठोर मेहनत करून नृत्य प्रशिक्षण घेतले. आजवर भरनाट्यम, कुचीपुडी, मोहिनीअट्टम आणि कथ्थकली या शास्त्रीय नृत्यप्रकारातील तरबेज प्रतिभासंपन्न नृत्यांगना म्हणून त्यांची ओळख आहे. इंग्रजी साहित्य एमए केल्यानंतर मौलिक संशोधन करून कोलकता येथील रवींद्रभारती विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी त्यांनी प्राप्त केली. "दक्षिण भारतातील शास्त्रीय नृत्यातील लास्य व तांडव या संकल्पनांचे विस्तृत अध्ययन' त्यांचा संशोधनाचा विषय होता. यावरून नृत्य हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, हे लक्षात येते. त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन सरे विद्यापीठातील "रिसर्च सेंटर फॉर क्रॉस कल्चरल म्युझिक अँड डान्स परफॉर्मन्स'ने त्यांचा पोस्ट डायरेक्‍ट संशोधनवृत्ती देऊन गौरवही केला आहे.

आज महोत्सवात
* राहुल व रोहित मिश्रा यांचे शास्त्रीय गायन
* शमा भाटे व त्यांच्या शिष्यांचे कथ्थक
* पं. अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन
* वेळ ः सायंकाळी 6 वाजता
* स्थळ ः देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debopriya and sucismita Chatterjee