निकालांवर "मायक्रोब्लॉगिंग'चा निर्णायक प्रभाव! 

file Photo
file Photo

नागपूर : सोशल मीडियावर उमेदवारांच्या प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून, "नेटिझन्स'ना जाळ्यात ओढण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. मात्र, उमेदवारांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात "मायक्रोब्लॉगिंग'वर भर दिला आहे. अगदी कमी शब्दात नेटिझन्स असलेल्या मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या "पोस्ट' व्हायरल केल्या जात आहेत. कमी शब्दातील "पोस्ट'चा तत्काळ प्रभाव पडत असल्याने विधानसभा निवडणूक निकालांवर राज्यभरात "मायक्रोब्लागिंग'चा निर्णायक प्रभाव पडणार आहे. 
इंटरनेट, सोशल मीडिया प्रत्येकाच्याच अंगवळणी पडला असून, विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांकडून नेटिझन्सला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहेत. आतापर्यंत उमेदवारांकडून मोठ्या नेटिझन्सना आकर्षित करण्यासाठी लेखसदृश मोठ्या शब्दांच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. परंतु सोशल मीडिया वापरकर्ते अगदी थोडक्‍यात व स्पष्ट पोस्टवरच लक्ष केंद्रित करीत असल्याने या निवडणुकीत उमेदवारांनी "मायक्रोब्लॉगिंग'वर भर दिल्याचे निरीक्षण सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नोंदविले. देशात सध्या 46 कोटी नागरिक इंटरनेटचा वापर करीत असून, ऑनलाइन खरेदीचा जगात देशाचा दुसरा क्रमांक आहे. त्यामुळे देशातील सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या प्रमाणाचा अंदाज येतो. एका सर्वेक्षणानुसार 2021 पर्यंत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या 63 कोटींच्या घरात पोहोचणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले. किंबहुना यासाठी तज्ज्ञांची फळीच उभी केली. थोडक्‍यातील संदेश व ब्लॉग यांचे संयुक्त रूप म्हणजे "मायक्रोब्लॉगिंग' आहे. लहान व थोडक्‍यातील संदेशाचा लवकरच परिणाम होतो. ब्लॉगमधून हजारो शब्दातून जो आशय पोहोचवायचा, तो थोड्या नेटनेटक्‍या व प्रभावी शब्दात पोहोचविला जात आहे. यासाठी व्हॉट्‌सऍप, फेसबुक ग्रुप किंवा इन्स्टाग्राम, ट्विटरचा वापर केला जात आहे. एखाद्याने दररोज सुप्रभातचा संदेश पाठविल्यास कदाचित त्याला कंटाळून "ब्लॉक' केले जाते. मात्र, व्हॉट्‌सग्रुप, फेसबुक ग्रुपद्वारे चांगली माहिती मिळत असेल ग्रुपमध्ये राहण्यास पसंती दिली जाते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून विविध ग्रुप्स तयार केले जात आहे किंवा अस्तित्वातील ग्रुपमध्ये 'मायक्रोब्लॉगिंग' केले जात असल्याचे पारसे यांनी सांगितले. "मायक्रोब्लॉगिंग'द्वारे सोशल मीडियावर थोडक्‍यात संदेशाचे फोटो, अगदी 30-40 सेकंदांचा प्रभाव पाडणारा व्हिडिओ "अपलोड' करून सोशल मीडिया वापरकर्त्यांना आकर्षित केले जात आहे. "मायक्रोब्लॉगिंग'चा वापर प्रत्येक उमेदवार करीत आहे. त्याचा प्रभावही मतदारांवर पडण्याची शक्‍यता असल्याने निवडणूक निकालावर निर्णायक प्रभाव पडणार असल्याचे पारसे यांनी सांगितले. 
काय आहे मायक्रोब्लॉगिंग? 
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार करण्यात आलेले संदेशवाहक फोटो, अगदी काही सेकंदांचे व्हिडिओ हा "मायक्रोब्लागिंग'चा प्रकार आहे. एकप्रकारे कमी शब्दात ब्लॉग लिहून आपले विचार पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविले जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवाराला तत्काळ काही आठवल्यास ते सहज पोस्ट करणे शक्‍य आहे. 
"मायक्रोब्लॉगिंग'चे व्यासपीठ 
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम, टंबलर हे मायक्रोब्लॉगिंगचे व्यासपीठ झाले आहे. ट्विटरवर कमी शब्दात मनाला भिडणाऱ्या पोस्ट करता येते. टंबलर मायक्रोब्लॉगिंगचे अद्ययावत ऍप आहे. यातील वेगवेगळ्या "टूल्स'मुळे सहज संदेश लिहिणे शक्‍य आहे. "इन्स्टाग्राम'वर एकापेक्षा जास्त संदेशवहन करणाऱ्या फोटोंचा वापर करता येतो. 
"मायक्रोब्लॉगिंग'मुळे अगदी कमी शब्दात प्रभावी मत मांडता येते. त्यामुळे वेळेचीही बचत होते. कमी शब्दातील संदेश सोशल मीडियावर जास्तीत जास्त सहज पसरतो. "सेलिब्रेटी'कडे वेळ नसल्याने ते अगदी कमी शब्दात सोशल मीडियावर मत मांडतात. हीच पद्धत आता उमेदवार वापरत आहेत. मायक्रोब्लॉगिंगद्वारे मतदारांपर्यंत सहज पोहोचून त्यांच्यावर प्रभाव टाकणे सुसह्य झाले आहे. 
- अजित पारसे, सोशल मीडिया विश्‍लेषक. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com