खाद्यपदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सची डिलिव्हरी!

खाद्यपदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सची डिलिव्हरी!

नागपूर - ऑनलाइन मद्यविक्री अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीनच आहे, पण महाराष्ट्राच्या उपराजधानीत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून आधीच हा प्रकार सर्रासपणे सुरू झाला आहे. बर्गर, पिझ्झा व इतर खाद्य पदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सच्या अवैध डिलिव्हरीवर पोलिस प्रशासनाचे अद्याप कुठलेही नियंत्रण नाही. नागपूर शहरातील पॉश वस्त्यांमध्ये असलेल्या होस्टेलमधून ही डिमांड केली जात असून यामध्ये मुलींचेच प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

नागपुरातील इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे विद्यार्थी शिकायला आहेत. हे सर्व विद्यार्थी होस्टेलमध्ये किंवा पेईंग गेस्ट म्हणून नागपुरात राहतात. विद्यार्थ्यांसह नोकरीच्या निमित्तानेदेखील मोठ्या प्रमाणात तरुण नागपुरात राहतात.  यात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलामुलींचा समावेश अधिक आहे. नागपुरातील गल्लीबोळांमध्ये आणि हायफाय बिअर बारमध्ये मुलांच्या खांद्याला खांदा लावून दारू पिणाऱ्या व सिगारेट ओढणाऱ्या तरुणी दिसतात. मात्र, खुलेआम व्यसन करण्याची भीती बाळगणाऱ्या तरुणींनी खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱ्या मुलांचा आधार घेतला आहे. वेबसाईट किंवा ॲपवरून खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावर संबंधित डिलिव्हरी बॉयचे नाव आणि मोबाईलनंबर आपल्याला येतो. लोकेशन ट्रॅक करण्यासाठी डिलिव्हरी बॉयला कॉलही करता येतो. याच कालावधीत या मुलींचा डिलिव्हरी  बॉयला कॉल जातो आणि त्याला दारूच्या बॉटल्स आणण्याची डिमांड केली जाते. कुणालाही शंका येऊ नये म्हणून कंपनीचा शर्ट काढून वाईन शॉपमध्ये जातात आणि दारूच्या बॉटल्स खरेदी करतात. हे सर्व उपद्‌व्याप करून दारूची दारापर्यंत डिलिव्हरी देण्याचे अधिकचे पैसे आकारले जातात. या मुलीदेखील सहज काम होत असल्याने वरचे शंभर ते दोनशे रुपये खर्च करण्याची तयारी ठेवतात.  

घरमालकाने उघडकीस आणला प्रकार
गेल्या आठवड्यात एका घरी भाड्याने राहणाऱ्या मुलींनी खाद्यपदार्थांसोबत दारूच्या बॉटल्स बोलावल्या. संपूर्ण पार्सल संशय येणार नाही, असेच पॅक केले होते. डिलिव्हरी बॉय घरी पोहोचला तेव्हा घरमालक अंगणातच होते. त्यांनी कुणाकडे जायचे आहे म्हणून नाव विचारले. घरमालकाला खात्री पटल्यावर त्यांनी जाऊ दिले. मात्र, त्याचवेळी दोन बॉटल्स एकमेकांवर आदळल्याचा आवाज त्यांना आला. त्यांनी डिलिव्हरी बॉयला रोखले आणि संपूर्ण चौकशी करून दुसऱ्या दिवशी मुलींना खोली रिकामी करायला लावली. 

या भागांतून होतेय मागणी
मेडिकल चौक, रविनगर, प्रतापनगर, भरतनगर, रामनगर, लक्ष्मीनगर, वर्धमाननगर, नंदनवन, धरमपेठ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com