esakal | मुलीचा विनयभंग करून घरे जाळली; लोणी लव्हाळ्यातील हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

demands arrest of attackers in buldhana

दोन्ही बाजूंकडून तक्रारी आल्या. त्यामुळे फासेपारधी समाजाच्या चार लोकांसह गावातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी सकाळ प्रतिनिधीला दिली. फासेपारधी समाजाच्या लोकांना दिलेली सुरक्षा अपुरी असून किमान एक महिन्यापर्यंत सशस्त्र पोलिसांचे संरक्षण द्यावे.

मुलीचा विनयभंग करून घरे जाळली; लोणी लव्हाळ्यातील हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

नागपूर : अज्ञान मुलीचा विनयभंग आणि वडिलांना बेदम मारहाण करून फासेपारधी समाजाची घरे पेटवून देणाऱ्या अंदाजे १५० हल्लेखोरांविरोधात ३०७, ३४ आणि ३४५ अंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी मागणी श्री दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेने केली आहे. यासंबंधाने संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले, बाबूसिंग पवार, नितीन पवार, सलीम भोसले, संतोष पवार यांनी मेहकर पोलिस स्टेशन, बुलडाणाचे जिल्हाधिकारी आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील लोणी (लव्हाळा फाटा) येथील फासेपारधी समाजाच्या वस्तीला मतीन भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी जाळलेली घरे, जाळलेल्या मोटरसायकली आणि राखरांगोळी दिसली. येथे सात कुटुंबे वास्तव्यास आहेत. चार तारखेला रात्री साडेसात वाजता येथील १६ वर्षांची मुलगी किराणा दुकानात गेली असता गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी छेड काढली आणि तिचा विनयभंग केला.

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

ती ओरडल्यावर वडील आले असता, त्यांनी प्रतिकार केला. यातून दोन्हीकडच्या लोकांमध्ये चांगलीच जुंपली. त्यानंतर येथील चवताळलेल्या लोकांनी लाठ्या, काठ्या, लोखंडी राॅडने वस्तीवर सामूहिक हल्ला चढविला. दीडशेच्या जवळपास हल्लेखोर आले होते, अशी माहिती त्यांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक संग्रामसिंग पाटील यांनीही वस्तीची पाहणी केली.

दोन्ही बाजूंकडून तक्रारी आल्या. त्यामुळे फासेपारधी समाजाच्या चार लोकांसह गावातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी सकाळ प्रतिनिधीला दिली. फासेपारधी समाजाच्या लोकांना दिलेली सुरक्षा अपुरी असून किमान एक महिन्यापर्यंत सशस्त्र पोलिसांचे संरक्षण द्यावे. तसेच सर्वच गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे