काकडे काकांच्या निधनाने प्रायोगिकतेचा आधार गेला

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः 94 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ, प्रायोगिक नाट्य चळवळीला ऊर्जितावस्था आणून अनेक रंगकर्मी घडविणारे ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक अरुण काकडे यांचे निधन वैदर्भीय रंगकर्मींना चटका लावून जाणारे आहे. सर्वांचेच लाडके काकडे काका कायम कुठलीही झूल न पांघरता रंगकर्मींच्या विकासासाठी झटत होते. अनेकदा ते नागपुरातही आले. नवोदितांना त्यांनी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने प्रायोगिक, हौशी रंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी राज्यभर आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि नवे रंगकर्मी घडविले. त्यांच्या निधनाने प्रायोगिक रंगभूमीचा आधारवड कोसळल्याची शोकसंवेदना नागपुरातील रंगकर्मींनी व्यक्त केली आहे.
रंगायन या संस्थेत काम करताना अरुणने विजयाबाईंना भरपूर मदत केली. आविष्कारची चळवळ तर अरुणमुळेच उभी राहू शकली. हा काम करणारा आणि रंगकर्मी घडविणारा कलावंत होता. त्यांचे विजयाबाई, तेंडुलकर, सुलभा देशपांडे अशा सगळ्यांशीच त्यांचे चांगले संबंध होते. एखादा कलावंत एकवेळ उभा करता येईल पण अरुणसारखा काम करणारा माणूस पुन्हा उभे करणे कठीण आहे. त्याची एक्‍झीट चटका लावणारी आहे, अशी संवेदना ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश अंभईकर यांनी व्यक्त केली.
अरुण काका प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड होते. अनेकदा ते नागपुरात येऊन गेले. त्यावेळी संजय भाकरे फाउंडेशनच्या सर्व नवोदित कलावंतांना त्यांनी आशीर्वाद दिला. आविष्कारची चळवळ उभी करण्यात त्यांचा वादातीत वाटा आहे. आविष्कारची शाळा पाडली त्यावेळी ते खूप रडले होते. इतका सच्चा माणूस पुन्हा मिळणे नाही. हे प्रायोगिक रंगभूमीचे नुकसान आहे, अशी शोकसंवेदना रंगकर्मी संजय भाकरे यांनी दिली.
अरुण काकडे यांनी रंगभूमीसाठी केलेले काम पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी प्रायोगिक नाटकांना उभारी दिली. त्यांच्यामुळे अनेक दुर्लक्षित संहितांना वाव मिळाला. त्यांचे निधन वेदनादायी असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर यांनी व्यक्त केले.
अरुण काकडे यांच्याशी माझा सततचा संवाद होता. ते आज गेले, याचा धक्काच बसला. प्रायोगिक रंगभूमीवरचे ते आघाडीचे रंगकर्मी होते. त्यांचे "दुर्गा झाली गौरी'हे नाटक 1984-85 साली झालेल्या नागपूर नाट्य संमेलनासाठी आणले होते. त्यावेळी ते स्वत:ही आले होते. छबिलदास नाट्य चळवळीतील त्यांनी अनेक नाटकांना व नटांना पुढे आणल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांनी सांगितले.
मराठी रंगभूमीवरचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी आपली भावना व्यक्त केली. अरुण काकडे यांनी कायम जमिनीवर राहून रंगभूमीची सेवा केली आहे. रंगकर्मींना नाट्य चळवळ म्हणून नाटकांची जाणीव करवून देण्यात, त्यांनी कमालीचे यश मिळविल्याचे गडेकर म्हणाले. त्यांच्या निधनाने विषण्ण वाटते आहे, अशी शोकसंवेदना नरेश गडेकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com