विदर्भातील कोरोना नमुन्यांची तपासणी एम्स, आयजीएमसीमध्ये

शुभम बायस्कार
सोमवार, 6 एप्रिल 2020

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या 11 जिल्ह्याच्या कोरोना नमुन्यांच्या तपासणीचा भार हा नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर होता.

अकोला : दिवसेंदिवस कोरोना संशयीतांचा आकडा वाढता आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही ताण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. अशातच पश्‍चिम विदर्भात आढळलेल्या कोरोना संशयीतांचे नमुने हे पूर्वी नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविले जात असायचे मात्र, वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये ते तपासल्या जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीतच पूर्व आणि पश्‍चिम विदर्भाची विभागणी करून आयजीएमसी व एम्स अशा दोन संस्थांवर ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गत काही दिवसांपासून कोरोनाच्या संशयीतांचा आलेख वाढत आहे. त्यामध्ये विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या 11 जिल्ह्याच्या कोरोना नमुन्यांच्या तपासणीचा भार हा नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर होता. वेळेवर कीट उपलब्ध न होणे, क्षमतेपेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी येणे यामुळे आयजीएमसीवरील भार दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे अकोल्यातील नमुने तपासणीसाठी सुमारे दोन दिवसांची कालावधी लागत असायचा. तर विदर्भातील इतरही जिल्ह्यांचीही स्थिती हीच होती. हा ताण कमी करण्यासाठी आणि नमुन्यांची तत्काळ तपासणी व्हावी यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख यांनी विदर्भातील अकरा जिल्ह्यांची नमुने वेगळवेगळ्या ठिकाणी तपासल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा - बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला अन्नछत्रांसाठी

त्यामध्ये पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या पाच जिल्ह्यातील कोरोना संशयीतांचे नमुने हे नागपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये तपासल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. तर पूर्व विदर्भातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यातील नमूने नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे तपासल्या जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील इतर जिह्यांचे नमुने येथे तपासल्या जातील
मुंबई महानगर महापालिकेकरिता कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई, ठाणे जिल्ह्याकरिता- रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा- ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालय, भायखळा मुंबई, 

पालघर जिल्ह्याकरिता - उल्हासनगर महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका बदलापूर नगरपालिका. प्रयोगशाळा- हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था, परळ, मुंबई सातारा जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

पुणे जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे
अहमदनगर : जिल्ह्याकरिता व नाशिक (मालेगाव, सटाणा तालुका वगळून) - प्रयोगशाळा- आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ः या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, जि.सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद - या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर, 

धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक (मालेगाव व सटाणा तालुका) ः या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड- या जिल्ह्याकरिता - प्रयोगशाळा - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

पश्‍चिम विदर्भातील नमुने एम्समध्ये
विदर्भातील 11 जिल्ह्यातील कोरोना संशयीतांची नमुने आयजीएमसीमध्ये पाठविण्यात येत होते. मात्र, आता वरिष्ठांच्या आदेशावरून पश्‍चिम विदर्भातील नमुने एम्समध्ये तर पूर्व विदर्भातील नमुने हे आयजीएमसीमध्ये पाठविणे सुरू झाले आहे.
-डॉ.अपूर्व पावडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detection of Corona Samples in Vidarbha at AIIMS, IGMC