चौफेर विकासाचे श्रेय जनतेलाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास टाकल्यामुळेच हे शक्‍य झाल्याचे आज सांगितले.

दक्षिण नागपुरातील सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण व विकासकामांच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन, कामगार क्रीडासंकुलाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे भूमिपूजन, राजाबाक्षा हनुमान मंदिर देवस्थान आणि रमना मारोती देवस्थानाच्या सौंदर्यीकरण व विकासकामांचे भूमिपूजन रिमोटची कळ दाबून त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर कोहळे होते. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, धंतोली झोन सभापती लता काडगाये, माधुरी ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, की मुलांना खेळता यावे यासाठी सुमारे 150 क्रीडासंकुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दक्षिण नागपुरात मिनी स्टेडियमसाठी आमदार कोहळे यांनी पाठपुरावा करीत अडचणी दूर केल्या. सक्करदरा तलाव सौंदर्यीकरणासोबत श्रद्धास्थान असलेले राजाबाक्षा हनुमान मंदिर आणि रमना मारोती मंदिरचा विकास आणि सौंदर्यीकरण होत आहे. यावेळी त्यांनी महापौर आणि आयुक्तांना उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करण्याचा मंत्र दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The development is attributed to the people