आचारसंहिता काळात थातूरमातूर विकासकामे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भिवापूर (जि.नागपूर):  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजूर किंवा सुरू केलेल्या विकासकामांना आचारसंहिता लागू होत नाही. कामातील अनियमितता, नियमबाह्यपणाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधीने केलेल्या तक्रारीची फारशी दखल घेतली जात नाही. नेमक्‍या यासंधीचा फायदा घेत स्मार्ट दलित वस्तीअंतर्गत शहरात थातूरमातूर कामे करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे.

भिवापूर (जि.नागपूर):  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजूर किंवा सुरू केलेल्या विकासकामांना आचारसंहिता लागू होत नाही. कामातील अनियमितता, नियमबाह्यपणाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधीने केलेल्या तक्रारीची फारशी दखल घेतली जात नाही. नेमक्‍या यासंधीचा फायदा घेत स्मार्ट दलित वस्तीअंतर्गत शहरात थातूरमातूर कामे करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे.
या योजनेंतर्गत दलित वस्त्यांमध्ये 11 कोटीची विकासकामे मंजूर आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या कामाच्या निविदा काढल्या होत्या. तत्पूर्वी नगरपंचायतीने त्या 11 कोटींच्या कामांचे एकच अंदाजपत्रक (प्राकलन) बनविले. दलित वस्तीतील प्रभागनिहाय रस्ते, भूमिगत नाल्या यावरील एकत्रित खर्चाची आकडेवारी प्राकलनात नमूद नाही. नेमका कोणत्या कामावर किती खर्च अपेक्षित आहे, ही बाब प्राकलनावरून लक्षात येत नाही.
     नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील मंजूर कामे व त्यावरील खर्चाची माहिती मागितली असता, बांधकाम अभियंता प्रभागनिहाय मंजूर कामाची यादी व त्यावरील खर्च सांगता येणे शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन संपूर्ण प्राकलन समोर करतात. 11 कोटींची कामे वेगवेगळ्या प्रभागासाठी आहेत. मात्र, त्याचे एकत्रित प्राकलन केले गेल्याने त्यामागे अर्थलाभाचा उद्देश ठेवला गेल्याची शक्‍यता आहे.
प्रभाग 16 मधील एका परिसराला ऑफिसर कॉलनी हे नाव आहे. त्याठिकाणी भूमिगत नाल्या व सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामध्ये अनियमितता आढळते. एका गल्लीतील पूर्ण केलेली भूमिगत नाली, त्यामध्ये टाकलेल्या पायल्यांना पुरेसा उतार न दिला गेल्याने एका ठिकाणी मधोमध फुटली आहे. रस्त्याची कामे ओबडधोबड आहेत. रस्ता बांधकामात प्रमाणबद्ध साहित्याचा वापर न केल्याने त्यावरील कॉंक्रिट पूर्वीच्या कामाची निकृष्ट स्थिती आपोआप उघडी पडत आहे.प्रभाग 14 मधील जिल्हा परिषद शाळेच्या मागे दोन गल्ल्यांमध्ये रस्ता बांधकामासाठी खोदकाम न करता मिश्रित साहित्य पसरविण्यात आले. रस्ता बांधकामाच्या नवीन पद्धतीनुसार काम होत असल्याचे अभियंत्याने सांगितले. मात्र, जीएसबीच्या ग्रेड-1 व 2 प्रकारानुसार याठिकाणी पसरविलेल्या मिश्रित साहित्यात 60 किंवा 40 एमएम बोल्डरचा पत्ता नाही. त्याऐवजी पाऊण इंचापेक्षा कमी खडीसह चुरी या स्वरूपातील हे मिश्रित साहित्य आहे. अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार त्यात डस्ट किंवा मुरूम आढळले नाही. अभियंत्याने कामाची स्थिती पाहण्यासाठी येण्याचे कबूल केले, मात्र रस्त्यावर पसरविलेले साहित्य आहे त्याच स्थितीत असल्याने त्यांनी काम पाहिले किंवा नाही याविषयी शंका आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development work during the Code of Conduct