

12-acre soybean crop burnt in a fire at Digras, Patur taluka.
esakal
पातूर, : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगाम आधीच संकटात सापडलेला असताना दिग्रस येथील महिला शेतकरी अनुसया सुभाष महल्ले यांच्या १२ एकर शेतातील सोयाबीन पिकाला आग लागून संपूर्ण पीक जळून खाक झाले. अज्ञात व्यक्तींनी हे पीक पेटविल्याचा संशय महल्ले यांनी व्यक्त केला असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकांवर झाला. दिग्रस परिसरातही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत अनुसया महल्ले यांनी दहा हजार रुपये ठोक्याने शेती करून १२ एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासून पीक वाढीपर्यंत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिकाची काळजी घेतली. पीक हाताशी येईल आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा होती.
महल्ले कुटुंबातील पाच व्यक्तींच्या उदरनिर्वाहाची भिस्त या पिकावर होती. शेतीसाठी केलेला ठोक्याचा खर्च, बियाणे, पेरणी, मशागत, खते, औषधांची फवारणी आणि अन्य खर्च यामुळे आधीच आर्थिक गुंतवणूक झाली होती. पावसाची अनिश्चितता असतानाही पीक वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, उभे सोयाबीन पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुटुंबाच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
शेतातील सोयाबीन पिकाला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मोठ्या क्षेत्रातील पीक आगीत जळून गेले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक आग लावली असावी, असा संशय महल्ले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेमागील व्यक्तींचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.