वलनी वेकोलि वसाहतीत घाणीचा मुक्काम ; रोगराईला निमंत्रण, वसाहत झाली जीर्ण 

दिलीप गजभिये
बुधवार, 11 डिसेंबर 2019

या वसाहतीत 750च्या अधिक परिवार वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे. ही वसाहत जर्जर झाली असून कधीही मोठा अपघात होण्याचे नाकारता येत नाही. शिवाय या वसाहतीत राहणारे नरक यातना भोगत आहेत. 

खापरखेडा, (जि. नागपूर) :  नजीकच्या वलनी येथील वेस्टर्न कोलफिल्ड्‌स लिमिटेड या कंपनीची कामगार वसाहत जीर्ण झाली असून येथे राहणे नागरिकांना दुरापास्त झाले आहे. वसाहतीत सर्वत्र घाण असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. कोळसा खाण कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या या वसाहतीमधील गाळे कामगारांनी भाड्याने दिले असल्याचेही वास्तव समोर आले आहे. 

1998 साली वकोलिची वलनी कोळसा खाण बंद पडली. येथून रेजिंगही बंद करण्यात आले. 2001 मध्ये खाण कुलूपबंद झाली. येथील कर्मचाऱ्यांचे इतर कोळसा खाणीत समायोजन करण्यात आले. येथे राहणारे कर्मचारी कमी झाले. या वसाहतीतून मात्र अनेक लोक इतरत्र राहण्यास गेले असले तरी अनेकांनी ही घरे भाड्याने दिली, कुणी येथे अतिक्रमण केले. या वसाहतीत 750च्या अधिक परिवार वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे. ही वसाहत जर्जर झाली असून कधीही मोठा अपघात होण्याचे नाकारता येत नाही. शिवाय या वसाहतीत राहणारे नरक यातना भोगत आहेत. 

कन्हान नदीचे पाणी दूषित 

ही बाब संबंधित प्रशासनाला ही सर्व बाब माहिती असल्याचे बोलल्या जात आहे. मागील अनेक दिवसांपासून या वलनी वेकोलि वसाहतीत सांडपाण्याचा नाल्या केरकचऱ्यासह पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्याचप्रमाणे येथील वसाहतीच्या "गडर'चे चेंबर सर्वत्र बंद झाले. संडासचे कनेक्‍शन थेट सांडपाण्याच्या नालीत काढले आहे. यामुळे ते नालीने वाहत जाऊन एका मोठ्या नाल्यात पोहोचते. त्यातून ते कन्हान नदीत मिसळत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. 

शिफ्ट होण्याच्या सूचना

मागील दीड दोन वर्षांपूर्वी या वसाहतीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. तेव्हापासून अद्यापपर्यंत स्वच्छता करण्यात आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वसाहतीत कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अनेक लोक अवैधरित्या कब्जा करून राहत आहेत. प्रशासनाने वलनी वसाहतीत राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यासह अतिक्रमणधारकांनाही येथील घरे रिकामे करण्यासाठी दोन नोटीस दिल्या आहेत. काहींना नजीकच्या राहणाऱ्या वेकोलि कर्मचाऱ्यांना चनकापूर अथवा सावनेरला शिप्ट होण्याकरिता तसे निर्देशही देण्यात आले आहेत. 

आजार बळावण्याची शक्‍यता

वलनी वसाहत जीर्णावस्थेत असल्याने संबंधित प्रशासन वसाहत रिकामी करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे प्रशासनाला या वसाहतीवर खर्च करायचा नसल्याने अधिकाऱ्यांनी लक्ष देणेही बंद केले. परिणामी अस्वच्छता वाढली. परिसर रोगराईला निमंत्रण देऊ लागला. ज्यामुळे मलेरिया, डायरिया, स्वाइन फ्लू, डेंगी यासारख्या आजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dirt, encroachment in the Valani colonies