यवतमाळ विधानपरिषदेसाठी भाजप विरुद्ध सेनेच्या "या' नावांची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

यवतमाळ विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बाहेर जिल्ह्यातील उद्योजक, कंत्राटदारांनी सुरुवातीपासून प्रयत्न चालविले आहेत. त्यात मुंबई, नागपूर व वर्धा येथील काही उद्योजकांची नावे चर्चेत होती. परंतु, जसजशी उमेदवारी अर्ज भरण्याची घटका जवळ येत आहे, तशी समीकरणेही बदलत आहेत.

यवतमाळ : यवतमाळ विधान परिषदेसाठी उद्या (ता. 14) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शिवसेनेकडून नागपूर येथील कॉंग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी हे सकाळी अकराला उमेदवारी दाखल करणार असून त्यांच्यासाठी मुंबईवरून पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना पाठविल्याची माहिती आहे. भाजपनेही नागपूरचा बलाढ्य उमेदवार शोधला असून किशोर कन्हेरे यांचे नाव अचानक समोर आले आहे. याशिवाय भाजपचे माजी उमेदवार मितेश भांगडिया यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. असले तरी यवतमाळचे कंत्राटदार सुमित बाजोरिया हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

भाजपकडून किशोर कन्हेरे, तर सेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींच्या नावांची चर्चा

यवतमाळ विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बाहेर जिल्ह्यातील उद्योजक, कंत्राटदारांनी सुरुवातीपासून प्रयत्न चालविले आहेत. त्यात मुंबई, नागपूर व वर्धा येथील काही उद्योजकांची नावे चर्चेत होती. परंतु, जसजशी उमेदवारी अर्ज भरण्याची घटका जवळ येत आहे, तशी समीकरणेही बदलत आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चर्तुर्वेदी यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईवरून शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यवतमाळात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळणे कठीण झाल्याचे गृहित धरून शिवसेनेची उमेदवारी मागणाऱ्यांनी आता आपला मोर्चा भाजपकडे वळविला आहे. भाजपकडून नागपूरचे उद्योजक किशोर कन्हेरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी ही जिल्ह्यातील उमेदवार देण्यात यावा अशी आहे. हाच धागा पकडून यवतमाळचे उद्योजक सुमित बाजोरिया यांनी आता भाजपकडेही चाचपणी सुरू केली आहे. 

बाहेर जिल्ह्यातील उमेदवारास विरोध 

दरम्यान, सोमवारी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सुमित बाजोरियादेखील उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेना व भाजपमध्ये हा सामना रंगणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने निष्ठावंतांची दखल न घेता बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार दिल्यास आपण उमेदवारी दाखल करू, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षाने मिलिंद नार्वेकरांना यवतमाळात पाठविल्याचीही चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion of names of BJP versus Sena for the Yawatmal Legislative Council