प्रखर उन्हामुळे लकवा आजाराचा धोका ः डॉ. अग्रवाल, डॉ. राठोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रखर उन्हामुळे लकवा आजाराचा धोका ः डॉ. अग्रवाल, डॉ. राठोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : "लकवा' शब्द उच्चारताच मनात धडकी भरते. त्यामागे कारणही तसेच आहे. या आजाराचा रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो. त्यामुळे या आजाराविषयी फार भीती असते. प्रखर उन्हामुळे "लकवा' मारण्याचा धोका असतो, अशी नावीन्यपूर्ण माहिती हिराचंद मुणोत मेमोरियल क्रिटिकेअर हॉस्पिटलचे प्रख्यात औषधोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल व न्यूरो फिजिशियन डॉ. हर्षल राठोड यांनी शनिवारी (ता.15) दैनिक "सकाळ'ला दिली.
शरीराचे हात, पाय, डोळे आदी स्नायू आदी भाग काम करीत नाही, त्याला साध्या सरळ भाषेत "लकवा' म्हटले जाते. शेतकरी, शेतमजूर उन्हात काम करतात. वृद्ध व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात घाम जातो, लघवीद्वारे पोटॅशियम शरीराबाहेर फेकले जाते. शरीराला आवश्‍यक पोटॅशियमची मागणी खाण्यापिण्यातून भरून निघत नाही. त्यामुळे हातापायाला कमजोरी येऊन अवयव काम करणे बंद करतात. घाबरल्यासारखे वाटणे, श्‍वासोच्छ्वास घ्यायला त्रास होणे, ही प्राथमिक लक्षणे दिसल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे उपचार घेणे आवश्‍यक आहे. बहुतांश वेळा योग्यवेळी निदान होत नाही. त्यामुळे अनावश्‍यक खर्च वाढतो. शिवाय मृत्यूची शक्‍यताही असते. भर उन्हात काम केल्यामुळे पोटॅशियमचे प्रमाण कमी होऊन हातपाय निष्क्रिय होतात. त्याला वैद्यकीय भाषेत हायपोकॅलेमिक पेरोडिक पॅरालिसीस म्हटले जाते. विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळेही या आजाराची संभावना बळावते. सुरुवातीला हातापायात लुळेपणा येतो. दुर्लक्ष केल्यास श्‍वसनक्रिया बंद पडून रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. रुग्णांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे, उन्हापासून स्वत:चा बचाव करावा. भरपूर पाणी प्यावे. हा आजार उद्‌भवल्यास तत्काळ उपचार घेऊन प्राण वाचवावे, असा सल्ला डॉ. अग्रवाल, डॉ. राठोड यांनी दिला. आतापर्यंत क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांचा वयोगट 30 ते 40 अहे. योग्य उपचारामुळे रुग्ण बरे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मधुमेह, मूत्रपिंडविकार, रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना उन्हामुळे लकवा होण्याची सर्वाधिक भीती असते. साधी रक्ततपासणी, ईसीजी करून या आजाराचे निदान करता येते.

शरीरात पोटॅशियमला विशेष महत्त्व आहे. त्याचे प्रमाण कमी झाल्यास "लकवा' मारण्याची भीती असते. आहारात फळ, नारळ पाणी, टमाटर, केळी, संत्रा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण जास्त असावे. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो.
- डॉ. दीपक अग्रवाल,
औषधोपचार तज्ज्ञ, क्रिटिकेअर हॉस्पिटल.

loading image
go to top