esakal | खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?
sakal

बोलून बातमी शोधा

dispute between navneet rana and shivsena amravati news

आता सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट लोकसभेत धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मात्र, हे दाम्पत्य नेहमी सारखे सेनेला का टार्गेट करीत असतात?  तसेच राणा दाम्पत्य आणि सेनेचा काय वाद आहे? हे पाहुयात.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

अमरावती : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य शिवसेना असेल किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. सचिन वाझे प्रकरण असो किंवा महाराष्ट्रातील वाढता कोरोनाचा संसर्ग प्रत्येकवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. आता सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट लोकसभेत धमकी दिल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. मात्र, हे दाम्पत्य नेहमी सारखे सेनेला का टार्गेट करीत असतात?  तसेच राणा दाम्पत्य आणि सेनेचा काय वाद आहे? हे पाहुयात.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मातोश्रीवर धडक देण्याचा प्रयत्न -
ऐन दिवाळीमध्ये राणा दाम्पत्याने शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे केले होते. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचविण्यासाठी ते 'मातोश्री'वर धडक देणार होते. मात्र, त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न फसला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणे गुन्हा आहे का? तसेच उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचं काम करत असल्याचा आरोपही राणा दाम्पत्यानी केला होता.

हेही वाचा - काँग्रेस नेते अद्यापही 'होम क्वारंटाइन', कार्यकर्ते अस्वस्थ; महापालिका पुन्हा भाजपच्या...

सेना आणि राणा दाम्पत्य वाद? -
नवनीत राणा यांनी २०११ साली राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर २०१४ ची लोकसभा निवडणूक देखील लढविली. मात्र, यामध्ये सेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. मात्र, त्यावेळी राणा यांना कळविण्यात आले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच अडसूळ यांनी राजकीय दबाबतंत्राचा वापर करून हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर राणा यांनी ४ जून २०१८ ला पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण निकाली लागत नाहीतर २०१८ ला अडसूळ यांनी राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. २०१४ पासून सुरू झालेला हा वाद २०१९ मध्ये टोकाला पोहोचला, जेव्हा आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केला होता. हे देखील प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे त्या नेहमी शिवसेनेच्या विरोधात तलवार उपसूनच असतात. त्यामुळे त्या जेव्हाही बोलायला तोंड उघडतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात काहीही बोलतात, असे सेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणतात. 

हेही वाचा - कोरोना बाधितांसाठी आणखी हजार बेड आणणार कुठून,...

खासदार सावंतांवर झालेला आरोप -
लोकसभेमध्ये लॉबीमध्ये खासदार सावंत यांनी 'तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते पाहून घेऊ, तुला जेलमध्येच टाकू, अशी धमकी दिल्याचा आरोप खासदार राणा यांनी खासदार सावंत यांच्यावर केला. त्यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देखील केली. त्यावरच खासदार सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा आरोप खोटा असून आयुष्यात मी कुणाला धमकावले नाही आणि महिलांना धमकी देण्याचा तर प्रश्‍नच येत नाही कारण मी एक शिवसैनिक आहे. असे काम करूच शकत नाही, असे ते म्हणाले. तसेच अडसूळांनी २०१९ मध्ये त्यांचे जातप्रमाणपत्र चुकीचे असल्याचा आरोप केला होता, तेव्हापासून त्या अशा बोलत असतात. तसेच संसदेत जेव्हाही त्या महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतात, त्यांच्या बोलण्यात आणि एकंदरीत देहबोलीवरून लक्षात येते की, त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिरस्कार करतात हेच दिसून येत असल्याचे सावंत म्हणाले.   

राणा दाम्पत्यांना भाजपशिवाय पर्याय नाही?
शिवसेनेसोबतच्या वादामुळे राणा दाम्पत्यासाठी सेनेचा मार्ग कधीचाच बंद झाला. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविली आणि त्या जिंकून देखील आल्या. त्यानंतर राज्यात सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तयार झाली आणि सरकार स्थापन झाले. सेना सत्तेत असल्यामुळे राणा दाम्पत्याची राजकीय कोंडी होत असल्याचे जाणकार सांगतात. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष एकत्र आल्याने आता भाजपशिवाय त्यांना पर्याय नसल्याचेही बोलले जाते. 

loading image