दिवाळी पर्यटन; ताडोबा, पेंच हाउसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्प दिवाळी सणानिमित्त फुल्ल झाला आहे. जंगल सफारीचे आकर्षण असलेल्या वन्यप्रेमींनी एक महिन्यापूर्वीच बुकिंग केलेले आहे. नवेगाव नागझिरा, उमरेड कऱ्हाडला, टिपेश्‍वर अभयारण्यातील दिवाळीनंतरच्या तारखाही बुक झालेल्या आहेत. 

नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्प दिवाळी सणानिमित्त फुल्ल झाला आहे. जंगल सफारीचे आकर्षण असलेल्या वन्यप्रेमींनी एक महिन्यापूर्वीच बुकिंग केलेले आहे. नवेगाव नागझिरा, उमरेड कऱ्हाडला, टिपेश्‍वर अभयारण्यातील दिवाळीनंतरच्या तारखाही बुक झालेल्या आहेत. 
वन्यजीव पर्यटनाकडे दिवसेदीवस पर्यटकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांना भेटी देऊ लागले आहेत. यंदा झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांची संख्या 40 टक्‍क्‍यांनी वाढल्याने यंदा वाघांचे दर्शन हमखास होईल या उद्देशानेही बुकिंग जोमाने झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी ऑनलाइन बुकिंगमुळे दिवाळीच्या मर्यादित सुट्यांचे नियोजन दोन महिन्यापासूनच करून पर्यटकांनी जंगल सफारीची नोंदणी करून ठेवली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देशासह विदेशातील पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद याच प्रकल्पात आहे. त्यामुळेही पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. त्यामुळेच 15 नोव्हेंबरपर्यंत हे प्रकल्प हाउसफुल्ल आहे. 
विदर्भातील पेंच, नवेगाव नागझिरा, बोर, उमरेड कऱ्हांडला, टिपेश्‍वर अभयारण्यांतील बुकिंग तीन नोव्हेबरपर्यंत फुल्ल आहे. काही मोजक्‍यात प्रवेशद्वारावरील प्रवेश शिल्लक आहेत. कोअरमधील मोहल्ली, कोलारा, फुटवंडा, नवेगाव, पांगडी आणि झरी हे सहाही गेटचे बुकिंग हाउसफुल्ल आहे. बफरमधील अलीझंझा, देवाडा-अडेगाव-आगरझरी, जुनोना, कोलारा, रामदेगी-नवेगाव, आगरझरी, मदनापूर, तिरकाडा, पागडी बफर, माबला येथील बुकिंगही 75 टक्के बुकिंग झाले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 
पर्यटकांची झुंबड 
पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खुर्सापार या गेटवरील बुकिंग हाउसफुल्ल आहे. इतर गेटवरही 90 टक्के बुकिंग झालेली आहे. सोमवारी दिवाळी पाडव्यापासूनच 3 नोव्हेंबरपर्यंत या गेटचे बुकिंग झालेले आहे. खुर्सापार गेटवर वाघांचे दर्शन हमखास होत असल्याने पर्यटकांची झुंबड या प्रवेशद्वारावर होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Tourism,Tadoba, Pench housefull