मध्य नागपुरात विकास कुंभारेंची दिवाळी! |Election result 2019

vikas kumbhare
vikas kumbhare
Updated on

नागपूर : मध्य नागपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विकास कुंभारे यांनी विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या सामन्यात कुंभारे यांनी कॉंग्रेसचे बंटी शेळके यांचा 4 हजार मतांनी पराभव केला. साडेआठ हजार मते घेणारे एमआयएमचे अब्दुल शरीक पटेल यांनीच शेळकेंची "पतंग' कापल्याची चर्चा मध्य नागपुरातील मतदारांमध्ये आहे. 
मध्य नागपूर मतदारसंघाची मतमोजणी काटोल मार्गावरील जि. प. शाळेत पार पडली. हलबा आणि मुस्लिमबहूल मध्य नागपूरचा सामना चुरशीचा असेल, असे भाकीत पूर्वीपासूनच वर्तविले जात होते. पहिल्या फेरीच शेळके यांनी दीड हजारांची आघाडी घेतली. दुसऱ्याच फेरीत मात्र विकास कुंभारे यांनी त्यांना मागे टाकले. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत राखली. पण, पाचव्याच फेरीत मिळावलेली 11 हजारांहून अधिकची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कमीकमी होत गेली. 
विकास कुंभारे यांनी 75 हजार 692 तर बंटी शेळकेंना 71 हजार 684 मते मिळाली. एमआयएमचे अब्दुल शरिक पटेल यांनी 8 हजार 565 मते घेतली. वंचित बहुजन आघाडीचे कमलेश भगतकर आणि बहुजन समाज पक्षाचे धर्मेंद्र महाडिक यांना दोन हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. भगतकर 1 हजार 614 मतांवर तर मंडलिक 1 हजार 971 मतांपर्यंतच मजल मारू शकले. 
कुंभारेंच्या मताधिक्‍यात घसरण 
विकास कुंभारे यांच्या मताधिक्‍यात कमालीची घसरण नोंदविली गेली. 2014 मध्ये विकास कुंभारे यांनी तब्बल 38 हजारांच्या मताधिक्‍यासह विजय नोंदविला होता. त्यांना 87 हजार 523 मते मिळाली होती, तर माजी मंत्री राहिलेले कॉंग्रेसचे उमेदवार अनीस अहमद यांना 49 हजार 452 मतांपर्यंतच मजल मारता आली होती. यावेळी विकास कुंभारेंचा विजयरथ 4 हजारांच्या मताधिक्‍यावरच थांबला. 
टपाली मतदानातही कुंभारेंची सरशी 
मध्यनागपूर मतदारसंघासाठी एकूण 348 टपाली मतं प्राप्त झाली. त्यातील 90 मते अवैध ठरली. एकूण 258 वैध मतांपैकी सर्वाधिक 128 मते विकास कुंभारे यांना मिळाली. बंटी शेळकेंना 116, कमलेश भगतकर व धर्मेंद्र मंडलिक यांना प्रत्येकी 4 तर पटेल यांना 2 मते मिळाली. 
कॉंग्रेसला 12, भाजपला 10 फेऱ्यांमध्ये आघाडी 
मध्य नागपूरची मतमोजणी 22 फेऱ्यांमध्ये पार पडली. त्यात पराभव स्वीकारणाऱ्या बंटी शेळकेंनी 12 फेऱ्यांमध्ये आघाडी मिळविली. तर, विजय संपादन करणारे विकास कुंभारे यांना 10 फेऱ्यांमध्येच आघाडी मिळाली. पाचव्या फेरीअखेर कुंभारेंना मिळालेली 11 हजार 692 मतांची आघाडी निर्णायक ठरली. शेवटच्या पाच फेऱ्यांमध्ये तर कॉंग्रेसनेच लीड घेत भाजपचे मताधिक्‍याला चांगलीच कात्री लावली. 
तीन फेऱ्यांची गणना रद्द 
बूथ क्रमांक 52 चा "17 सी'चा फॉर्म मिळाला नाही. यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. मतदानासंदर्भात संपूर्ण तपशील या फॉर्ममध्ये असतो. पण, तोच नसल्याने अखेर या बूथवरील यंत्राची गणना रद्द करण्यात आली. यानंतर मतदान केंद्र क्रमांक 75 व 76 मधील मशीन बदलताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा आक्षेप बंटी शेळके यांच्याकडून घेण्यात आला. या दोन केंद्रांवरील यंत्रांची गणनासुद्धा घेण्यात आली नाही. या तिन्ही केंद्रावरील एकूण मते 1760 असल्याचे समजते. नियमानुसार संबंधित यंत्रांमधील एकूण मते एकूण आघाडीपेक्षा कमी असल्यास रद्द केलेल्या फेऱ्यांची गणना केली जात नाही. या नियमाचा थेट लाभ कुंभारे यांना मिळाला अन्यथा त्यांची लीड आणखीच कमी झाली असती, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला. मतदान केंद्र क्रमांक 262 संदर्भातही तक्रार नोंदविली गेली होती. 
प्रक्रिया अर्धातास खंडित 
मतमोजणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली असताना दुपारी 4.35 वाजता एका उमेदवाराकडून निकालाच्या पडताळणीसाठी दोन तासांचा अवधी देण्याची मागणी करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती मान्य करीत आक्षेप नोंदविण्यासाठी अर्धातासाचा अवधी दिला. परंतु, या काळात आक्षेप नोंदविण्यात न आल्याने प्रक्रिया पुढे सुरळीत पार पडली. 
नोटाने दहा उमेदवारांना टाकले मागे 
मध्य नगपूर मतदारसंघाच्या रिंगणात एकूण 13 उमेदवारांनी दंड थोपटले होते. मतदारसंघातील 2 हजार 149 मतदारांनी नोटासमोरील बटण दाबले. तब्बल दहा उमेदवारांपेक्षा नोटाला मिळालेली पसंती अधिक आहे. बसप व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनासुद्धा नोटापेक्षा कमी मतांवर समाधान मानावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com