मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे करणार नाहीच.. वाघांच्या नसबंदीचा मुद्दाच गैरलागू.. असे कोण म्हणले वाचा..

मिलिंद उमरे 
Monday, 10 August 2020

वाघांची नसबंदी करण्याचा मुद्दा वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. तो शेवटचा पर्याय असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पर्याय नाकारला असला; तरी वन्यजीवांप्रति संवेदनशील असलेल्या निसर्गप्रेमींमध्ये हा मुद्दा चर्चेलाच कसा येऊ शकतो, असा प्रश्‍न विचारत तिखट प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

गडचिरोली: संपूर्ण राज्यातील वाघांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात असून वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मानव-वन्यजीव संघर्षही वाढत आहे.

या पार्श्‍वभूमीवर वाघांची नसबंदी करण्याचा मुद्दा वन्यजीव मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. तो शेवटचा पर्याय असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पर्याय नाकारला असला; तरी वन्यजीवांप्रति संवेदनशील असलेल्या निसर्गप्रेमींमध्ये हा मुद्दा चर्चेलाच कसा येऊ शकतो, असा प्रश्‍न विचारत तिखट प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

आजवर कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नसबंदीचा उपक्रम राबवत होती. कुत्र्यांच्या नसबंदीच्या उपक्रमांचीही बहुतांश ठिकाणी नीट अंमलबजावणी होत नाही. त्यात वाघांच्या नसबंदीचा विचारही करणे योग्य नाही, असे मत अनेक निसर्गप्रेमींनी प्रसारमाध्यमांवर व्यक्त केले.

क्या बात है! - अखेर तिने घातलीच आकाशाला गवसणी! ‘टार्गेटेड’अभ्यासावर भर दिल्याने यूपीएससी ‘क्रॅक’

सरकार असा  विचार तरी कसा करू शकते

देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ वाढावा म्हणून मागील अनेक वर्षांपासून वनविभागासह कित्येक निसर्गप्रेमी, निसर्ग संस्था, संघटना कठोर परीश्रम घेत आहेत. असे असताना आता चक्‍क वाघांची नसबंदी करून त्यांच्या पुढच्या पिढ्या गारद करण्याचा सरकार विचार तरी कसा करू शकते, असा सवाल अनेकजण करीत आहेत. 

असा क्रूर निर्णय कधीच घेणार नाहीत पण...

मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला नाकारून चर्चेला विराम दिला आहे. मात्र मुद्दा चर्चेला आणणेच अनुचित असल्याची अनेकांची भावना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: उत्तम निसर्ग छायाचित्रकार असून निसर्गावर प्रेम करणारे आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात फिरून त्यांनी येथील निसर्ग न्याहाळत छायाचित्रे घेतली आहेत. त्यामुळे ते असा क्रूर निर्णय कधीच घेणार नाहीत. पण, भविष्यात सरकार बदलले आणि दुसरी व्यक्ती आली, तर या पर्यायाचे भूत फाइल्सच्या कुपीतून बाहेर निघू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

सविस्तर वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत

नवे उपाय शोधण्याची गरज

सध्या वाढत्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढून अनेक माणसे मारली जात आहेत. त्यामुळे वाघांविषयीचा असंतोष निर्माण होऊन आतापर्यंत केलेली जनजागृती व्यर्थ जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वाघांचे व्यवस्थापन करण्यासाठी नवे उपाय शोधण्याची गरज आहे. यातील एक उपाय म्हणून सरकार 50 वाघांच्या स्थानांतरणाचा विचार करीत आहे. हा उपाय कागदोपत्री सोपा वाटत असला, तरी त्यासाठी अनुभवी व्याघ्रतज्ज्ञ, प्रचंड मोठ्या संख्येने कर्मचारी व साधने असा मेळ जमवून आणावा लागणार आहे. म्हणून आणखी नवे उपाय शोधण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not even think about Sterilization of tigers said nature lovers