ठाकरी गावाचे नागरिक म्हणाले, दारूबंदी उठवून गावाचे नुकसान करू नका; मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

मिलिंद उमरे
Wednesday, 11 November 2020

जिल्ह्यातील दारूबंदी टिकविण्यासाठी गावागावात ठराव घेतले जात आहेत. ठाकरी येथेसुद्धा बैठकीचे आयोजन करून दारूबंदीची अंमलबजावणी करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. ठाकरी येथे दारूविक्री बंद असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. मात्र, जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यास आमच्या गावासहित पूर्ण जिल्ह्याचे नुकसान होणार आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दारू सुरू झाल्यास आमच्या गावासह जिल्हावासींना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दारूबंदी उठवून गावांचे नुकसान करू नका, अशी मागणी चामोर्शी तालुक्‍यातील ठाकरीवासींनी केली आहे. तसेच दारूबंदी मजबूत करण्यासाठी एकमताने ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यासाठी अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व जिल्ह्यातील गावांनी प्रयत्न केले आहेत. अखेर 1993 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. दारूबंदीचे अनेक फायदे असूनसुद्धा काहीजणांनी दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अवश्य वाचा  : मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचातील नागरिकांचा रस्ता झाला बंद; गेटच्या फाटकाला लागले कुलूप

जिल्ह्यातील दारूबंदी टिकविण्यासाठी गावागावात ठराव घेतले जात आहेत. ठाकरी येथेसुद्धा बैठकीचे आयोजन करून दारूबंदीची अंमलबजावणी करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. ठाकरी येथे दारूविक्री बंद असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. मात्र, जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यास आमच्या गावासहित पूर्ण जिल्ह्याचे नुकसान होणार आहे. युवक दारूच्या आहारी जातील. महिलांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवत प्रबळ अंमलबजावणी करा, अशी मागणी ठाकरीवासींनी केली आहे.

बैठकीला सरपंच नंदा कुलसंगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू माटमवार, पोलिस पाटील मारोती चुनारकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.

जाणून घ्या : गोंदियात जहाल नक्षलवाद्याला अटक, १० वर्षांपासून होता फरार

आरमोरीतील 40 गावांचेही समर्थन

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी एकूण 833 गावांमध्ये ठराव घेण्यात आले आहेत. आरमोरी तालुक्‍यातील 40 गावांना दारूबंदी कायम हवी आहे. यासाठी या गावांनी ठराव घेऊन दारूबंदीची अंमलबजावणी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. जिल्ह्यात 1993 मध्ये शासकीय दारूबंदी लागू झाली. अनेक गावकऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेत गावातून दारू हद्दपार केली. जिल्ह्यातील दारू पिणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली. दारूबंदीचे अनेक फायदे झाले. मात्र, काही ठिकाणी दारूबंदी उठविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दारूबंदी अधिक मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील 833 गावांनी पुढाकार घेतला आहे. आरमोरी तालुक्‍यातील 40 गावांनी ठराव घेऊन दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not harm the village by lifting the liquer ban